पत्रकार मित्र संतोष गोरेंचे ‘ब्रेकिंग न्यूज’! 

0
20200922_173501
मुंबई, दि. 22 सप्टेंबर:
माध्यम क्षेत्रात काळानुसार झपाट्याने बदल होत आहेत. वर्तमान पत्र, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम असा वेगाने बदल होत आहे. या बदलाबरोबरच माध्यमांमधील जगही तेवढ्याच झपाट्याने बदलत आहे. न्यूज रुममधली धावपळ,  कामाचा वेग, येणारा प्रचंड ताण याबरोबरच प्रचंड स्पर्धा आणि अस्थिरतेच्या वातावरणातील करिअर यावर पत्रकार संतोष गोरे यांनी ब्रेकिंग न्यूज हे पुस्तक लिहिले आहे.
संतोष गोरे यांना माध्यमातील जवळपास 20 वर्षांचा अनुभव आहे. या काळात माध्यम व माध्यमातील लोकांमध्ये झालेले बदल त्यांनी जवळून अनुभवले आहेत. हे अनुभवच त्यांनी या पुस्तकात मांडले आहेत.
ब्रेकिंग न्यूज हे पुस्तक कसे आहे हे गोरे यांचे आणखी एक सहकारी टी व्ही 9 मराठीचे कार्यकारी संपादक गजानन कदम यांनी सांगितले आहे. ‘ब्रेकिंग न्यूज’ बद्दल ते म्हणतात की, “संतोष गोरेंचे ब्रेकिंग न्यूज पुस्तक फक्कड बनलंय. सगळ्यांनी आवर्जुन वाचा. मला हातात घेतल्यावर टाकू वाटले नाही. माझ्या आजूबाजूचाच इतिहास असल्यानं वाचण्यात मजा आली. गोरे जसा वास्तवात आहे तसाच पुस्तकात. चिमटे, टोमणे, शालजोडीतले सगळं पुस्तकात आहे. किस्से वाचून तर गारुची स्मरणशक्ती भन्नाटच आहे यावर शिक्कामोर्तब झाले.
नवशिक्यांसाठी तर पुस्तक आदर्श बनून जाईल. मराठी व्याकरणात जसं वाळिंब्यांचं पुस्तक आहे तसंच हे पत्रकारितेत. ई. टीव्ही, tv9 मधले किस्से कसलीही भीडभाड न ठेवता, आप-पर भाव न दाखवता छापलेत. डेअरिंगचं काम. असं असलं तरी पुस्तकात सहकाऱ्यांच्या कौतुकाचं पारडं निश्चितच जड आहे. प्रत्येकाला नावानिशी उद्धृत केल्यानं आता प्रत्येक जण गोरेरचे देणं लागेल.
टीव्ही पत्रकारितेतल्या प्रत्येक अंगाला स्पर्श झालाय. चॅनेलच्या इनपुट, आऊटपुट, पीसीआर, ग्राफिक्स, अँकरिंग, एडिट अशा सगळ्या विभागाची झाडाझडती आहे. पुस्तकातले बारकावे तर अफलातूनच आहेत.
अँकर होण्याची सुप्त आणि अतृप्त इच्छा अनेक वर्षांची, पण देवाजीच्या मनात कदाचित गारुला तज्ज्ञ बनवायचे असावे. यापुढे पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी, ‘ब्रेकिंग न्यूज वाचले नाही तर काहीच वाचले नाही’ असे होईल, खरंच भट्टी भारी जमलीय”.
संतोष गोरे यांचे हे पुस्तक amazon वर उपलब्ध असून ते आवर्जून वाचायला हवे.गोरे यांनी एवढा चांगला व महत्त्वाचा दस्तावेज आणला त्याबद्दल त्यांना खूप शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *