अटल सेतूवरून वर्षात ८३ लाख वाहनांचा प्रवास..
अटल सेतूवरून वर्षात ८३ लाख वाहनांचा प्रवास..
मुंबई, दि. १४ जानेवारी;
मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूला एक वर्ष पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १३ जानेवारी २०२४ रोजी अटल सेतूचे उद्घाटन झाले होते. आधुनिक पायाभूत सुविधा, सुरक्षितता आणि कार्यक्षमतेचे प्रतीक ठरलेल्या या अत्याधुनिक सेतूमुळे कनेक्टिव्हीटीमध्ये अमूलाग्र परिवर्तन घडून आलेच, त्याचप्रमाणे प्रवासी सुरक्षितता आणि कार्यक्षमता या निकषांवरही नवे मापदंडही प्रस्थापित झाले आहेत. गेल्या वर्षभरात अटल सेतूवरून ८३,०६,००९ वाहने धावली. अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी X वरून दिली आहे.
अटल सेतूमुळे मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक सुरळीत आणि वेगवान झाला आहे. या सेतूवरून दररोज सरासरी २२,६८९ वाहने प्रवास करतात, तर १४ जानेवारी २०२४ या एका दिवसात सर्वाधिक ६१,८०७ वाहनांनी या सेतवरून प्रवास केला. अटल सेतूवरील भक्कम वाहतूक व्यवस्थापन आणि प्रगत वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (ATMS), अग्निशमन वाहने (FRVs), देखभाल पथके आणि गस्त पथके यांचा समावेश असलेल्या आपत्कालीन प्रतिसाद प्रणालीमुळे या सेतूवरील प्रवास सुरळीत होण्याची खातरजमा करण्यात आली आहे. तसेच, अनुचित घटना घडल्यास तात्काळ कार्यवाही करण्यासाठी यंत्रणा सज्ज असते. वाहतूक निरीक्षण, वैद्यकीय मदत आणि अडथळे दूर करण्यासाठी तीन विशेष पथके २४ तास कार्यरत असून, त्यामुळे उच्च सुरक्षा मानक राखले आहेत.
अटल सेतू हे महाराष्ट्रात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी आमच्या सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. अवघ्या एका वर्षात, या सेतूवरून ८० लाखांहून अधिक वाहने धावली आणि या भागाच्या आर्थिक व सामाजिक विकासात मोठे योगदान दिले आहे. हा महत्त्वाचा टप्पा गाठल्याबद्दल मी एमएमआरडीएच्या टीमचे त्यांच्या अथक प्रयत्न आणि दूरदृष्टीबद्दल अभिनंदन करतो.
अटल सेतू हा केवळ एक पूल नाही, तर मुंबई महानगर प्रदेशातील शहरी वाहतुकीची व्याख्या नव्याने करणारी जीवनवाहिनी आहे. या सेतूचे उत्तम संचालन आणि यंत्रणा यावरून प्रगत वाहतूक व्यवस्थापन आणि आपत्कालीन प्रतिसाद प्रणालींच्या कार्यक्षमतेचे महत्त्व अधोरेखित होते. हा टप्पा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण असून भविष्यातील पायाभूत सुविधांच्या उत्कृष्टतेसाठीचे एक महत्त्वाचे एक पाऊल आहे.
