… नाहीतर OBC ५४ % आहोत यावर शिक्कामोर्तब करा !

0
IMG-20250112-WA0081

… नाहीतर OBC ५४ % आहोत यावर शिक्कामोर्तब करा !

 

शेगाव,दि.१३ जानेवारी :-

माळी समाजामध्ये अनेक पोट जाती आहेत या सर्व जातींनी माळी म्हणून एकसंघ राहायला हवे. ओबीसींच्या न्याय हक्कासाठी सर्वांनी एकत्र राहणे अतिशय महत्त्वाचे आहे असे सांगत एकतर जातनिहाय जनगणना करा किंवा आम्ही ५४ टक्के आहोत यावर शिक्कामोर्तब करा असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

 

शेगाव येथे माळी समाज राज्यस्तरीय युवक युवती परिचय महासंमेलन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

 

यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की,गेल्या ३१ वर्षांपासून माळी सेवा मंडळाच्या माध्यमातून अखंडपणे माळी समाज राज्यस्तरीय युवक युवती परिचय महासंमेलन आयोजित करण्यात येत आहे. ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर काम करणार हे मंडळ सामाजिक कार्यात अग्रेसर राहून काम करतंय ही अतिशय महत्वपूर्ण बाब आहे. या मंडळाने सन १९९०-९२ च्या कालावधीत सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. इतर समाजाने देखील याचे अनुकरण करून असे विवाह सोहळे आयोजित करण्यास सुरुवात केली. ही या मंडळाच्या सामाजिक कार्याची महत्वाची पावती असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

माळी समाजात फूल माळी, हळदी माळी, जिरे माळी, काशी माळी, काच माळी, लिंगायत माळी, फुले माळी, कडू, बावने, अधप्रभू, अधशेटी, वनमाळी, पाच कळशी, चौकळशी, क्षत्रिय माळी अशा माळी समाजात अनेक पोट जाती आहे. मात्र आपण सर्वांनी माळी म्हणून एकत्र राहिले पहिले, एकसंघ राहिले पाहिजे. ओबीसीमध्ये माळी समाज हा एक महत्वाचा घटक आहे. त्यामुळे ओबीसींच्या प्रश्नांवर आपण नेहमीच जागरूक राहून काम केलं पाहिजे. इतर समाज बांधवांना सोबत घेऊन आपण पुढे जायला हवे. त्यातून महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य आपण पुढे घेऊन जाऊ शकतो असे त्यांनी यावेळी सांगितले.

 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या लढाईत माळी समाजाचे सैनिक सरदार देखील होते. त्यामुळे आपला समाज हा लढवय्या आहे त्यामुळे घाबरून चालणार नाही ज्या ठिकाणी अन्याय होत असेल त्या ठिकाणी अन्यायाच्या विरोधात आपल्याला लढावेच लागेल. ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्नावर न्यायालयात लढाई लढली जात आहे. तिथे तुमची संख्या किती याची विचारांना होते. पूर्वी जी जातनिहाय जनगणना झाली त्यात आम्ही ५४ टक्के आहोत हे मंडल आयोगाने देखील मान्य केलं आहे. मात्र तरी देखील आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. यासाठी जात निहाय जनगणना करण्याची नितांत आवश्यकता आहे. एकतर सरकारने जात निहाय जनगणना करावी किंवा आम्ही ५४ टक्के आहोत यावर शिक्कमोर्तब करावे असे त्यांनी सांगितले.

 

समाजातील मागासवर्गीय वंचित घटकांसाठी लढत राहणे आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम नेहमीच समता परिषदेने केले आहे. गेली वर्ष – दीड वर्ष आपण सर्वांनी जो लढा दिला तो जनतेसमोर आहे. पण लढाई संपलेली नाही, अजूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेल्या अधिकारावर गदा आणण्याचे काम काही मंडळी करतील त्यावेळी आपल्याला लढावे लागेल. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही आपली दैवत आहे. या महापुरुषांनी समाजातील वंचित घटकांसाठी आपला आयुष्य वेचले लढा दिला. आपण त्यांच्याच विचारांवर काम करत आहोत त्यामुळे आपल्याला मागे राहून चालणार नाही. त्यांच्या विचारांवर आपल्याला काम करायचे आहे. त्यामुळे ओबीसींच्या न्याय हक्कासाठी आपल्याला एकसंघ राहून काम करायचे असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *