सेनेचा गल्लीत गोंधळ, दिल्लीत सावळा गोंधळ!
मुंबई, दि. 21 सप्टेंबर:
केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी विधेयकांवरून लोकसभा व राज्यसभेत वेगवेगळी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेवर भाजपने जोरदार टीका केली आहे. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करून शिवसेनेवर टीका केली आहे.
शिवसेनेने लोकसभेत सीएएचे समर्थन आणि यू-टर्न घेऊन राज्यसभेत विरोध केला होता आणि आता कृषी विधेयकालाही लोकसभेत पाठिंबा आणि राज्यसभेत विरोधात भाषण करुन सभात्याग केला म्हणजे महापालिकेच्या स्थायी समितीपासून संसद भवनापर्यंत ‘सेम टू शेम!’ गल्लीत नुसताच गोंधळ आणि दिल्लीत सावळा गोंधळ!
मोदी सरकारच्या कृषी विधेयकांना विरोधी पक्षांनी जोरदार विरोध केला होता. भाजपचा मित्रपक्ष अकाली दलाच्या हरसिमरत कौर यांनी मंत्रिपदाचा राजीनामाही दिला तर शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिवसेनेने लोकसभेत कृषी विधेयकाला पाठिंबा दिला मात्र राज्यसभेत विरोधी आवाज उठवत सभात्याग केला. शिवसेनेच्या या परस्परविरोधी भूमिकेवर आशिष शेलार यांनी टीका केली.
