फुले, आंबेडकर विचाराची लढाई संपलेली नाही.
फुले, आंबेडकर विचाराची लढाई संपलेली नाही.
पुणे, दि.२८ नोव्हेंबर:-
महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील वंचित घटकांना न्याय देण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांना देखील मोठ्या संकटांचा सामना करावा लागला. ही लढाई अद्याप संपलेली नाही. त्यामुळे या महापुरुषांचे विचार पुढे नेऊन अन्यायाच्या विरुद्ध लढा देण्याची गरज असून समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण काम करत राहिले पाहिजे. जे लोक आपल्यासाठी लढत आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दिला जाणारा ‘समता पुरस्कार’ फुले वाडा समता भूमी पुणे येथे प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक,अभिनेते नागराज मंजुळे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी नागराज मंजुळे यांना रुपये एक लक्ष, फुले पगडी, मानपत्र शाल आणि स्मृतीचिन्ह देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी नागराज मंजुळे यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, महात्मा फुले समता भूमी ही आपल्यासाठी शक्ती केंद्र असून आपली वैचारिक शक्ती वाढविण्यासाठी आपण या शक्ती केंद्राला भेट देत असतो.फुले, शाहू, आंबेडकर या महापुरुषांनी एवढे प्रयत्न करूनही समाजातील अंधश्रद्धा अद्याप दूर झालेली नाही. या महापुरुषांचे विचार घेऊन नागराज मंजुळे यांनी सामाजिक वारसा विकसित केला आहे. समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचे काम लेखक, दिग्दर्शक अभिनेते नागराज मंजुळे यांनी आपल्या चित्रपट निर्मितीतून केली असून त्याचं काम अविरत सुरु आहे. त्यामुळे या पुरस्कारासाठी आपण त्यांची निवड केली.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाड्यात जी पहिली शाळा सुरु केली. त्याचठिकाणी राष्ट्रीय स्मारक विकसित करण्यात येणार आहे. त्याचे काम सुरु करण्यात आले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. महात्मा फुले स्मारक परिसराचा विकास करण्यासाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच त्यातून या स्मारकांचा विकास करण्यात येणार आहे.अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पाठपुराव्यातून पुणे विद्यापीठात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळे उभारण्यात आली आहे. तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थळी आपण २०० मुलींसाठी एनडीची प्रबोधनी सुरु करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
