‘मित्राचा’ निर्णय झाल्यावरच CM ठरेल व सरकार बनेल.

0
IMG-20241123-WA0294

‘मित्राचा’ निर्णय झाल्यावरच CM ठरेल व सरकार बनेल.

मुंबई, दि. २७ नोव्हेंबर;

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण याचा निर्णय जोपर्यंत ‘मित्र’ घेत नाही तोपर्यंत सरकार व मुख्यमंत्री होणार नाही. अडीच वर्षात निम्मी मुंबई व महाराष्ट्र मित्राला विकला आहे, यापुढेही महाराष्ट्र विकण्याचे काम हे सरकार करेल, त्यामुळे ‘मित्राचा’ आदेश येताच मुख्यमंत्री व सरकार बनेल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

पटोले पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष युतीला पाशवी बहुमत मिळाले असूनही चार दिवस झाले तरी मुख्यमंत्री निश्चित होत नाही आणि सरकारही स्थापन होत नाही. राज्यात शेतकऱ्यांचा समस्या आहेत, बेरोजगारी, महागाई, कायदा व सुव्यवस्था असे प्रश्न आहेत पण भाजपा युतीला जनतेची चिंता नाही.

पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, ईव्हीएम संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना केलेले विधान राजकीय आहे, असे मत मांडता येते का हा प्रश्न आहे. निकाल देताना कायद्यात काय तरतूद आहे. त्यावर स्पष्टता असायला हवी होती. परंतु न्यायाधीश व न्यायालयाच्या निकालावर जास्त काही बोलणे उचित नाही असेही पटोले म्हणाले.

काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेता, गट नेता व प्रतोद ठरवण्याचे सर्व अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना देण्याचा ठराव एकमताने या बैठकीत करण्यात आल्याची माहितीही नाना पटोले यांनी दिली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला विजय वडेट्टीवार यांनी अनुमोदन दिले. डॉ. नितीन राऊत व अमित देशमुख यांनी या प्रस्तावाचे समर्थन केले. सर्व आमदारांनी एकमताने हा ठराव मंजूर केला.

गुरुवार दि. २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता टिळक भवन, दादर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षाच्या विधानसभा उमेदवारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *