विधानसभेत भाजपा युतीचा दणदणित विजय!
विधानसभेत भाजपा युतीचा दणदणित विजय!
मुंबई, दि. २३ नोव्हेंबर:
विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा युतीने दणदणीत विजय मिळवत सत्ता कायम ठेवली असून भारतीय जनता पक्ष सर्वाधिक १३७ जागा जिंकत राज्यात पहिल्या नंबरचा पक्ष ठरला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ५७ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ४१ जागांवर विजय मिळवला आहे. भारतीय जनता पक्षाला साध्या बहुमतासाठी केवळ ८ जागांची गरज आहे.
भारतीय जनता पक्षाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे. २०१४ साली प्रथमच १२२ जागा जिंकल्या होत्या त्यानंतर २०१९ मध्ये १०५ जागांवर विजय मिळवला होता. विशेष म्हणजे चार महिन्याआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा युतीचा दारुण पराभव झाला होता. भाजपाला फक्त ९ जागांवर विजय मिळवला होता, अवघ्या ४ महिन्यात भाजपा युतीने जोरदार कमबॅक केले आहे.
महाविकास आघाडीची कामगिरी मात्र अत्यंत खराब झाली असून लोकसभेच्या कामगिरीचे सातत्य ते राखू शकले नाहीत. महाविकास आघाडीत काँग्रेस जेमतेम २१ जागांवर, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस १४ तर उद्धव ठाकरेंची शिवसेना १६ जागांवरच विजयी झाली आहे. लोकसभेत काँग्रेसने १३, शरद पवार यांनी ८ जागांवर तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ९ जागांवर विजय मिळला होता. विधानसभेला मात्र महाविकास आघाडीची घसरण झाली. विरोधी पक्षांची संख्या पाहता विधानसभेत विरोधी पक्षनेताही असणार नाही.
