अशोक चव्हाणांची कन्या श्रीजया भोकर मधून विजयी.

0
FB_IMG_1732363761545

अशोक चव्हाणांची कन्या श्रीजया भोकर मधून विजयी.

 

नांदेड, दि. २३ नोव्हेंबर:

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघातून ४९ हजार ६७१ मतांनी विजयी झाल्या आहेत.

या निकालावर खासदार अशोक चव्हाण प्रतिक्रिया देताना म्हणाले की, हा ऐतिहासिक विजय असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे मार्गदर्शन आणि देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांचे नेतृत्व, भाजपचे निवडणूक प्रभारी भुपेंद्र यादव व अश्विनी वैष्णव यांचे नियोजन तसेच असंख्य कार्यकर्त्यांची मेहनत यातून महायुतीचा महाविजय साकारला आहे. लाडकी बहिण, युवा कार्यप्रशिक्षण, शेतकरी मोफत वीज सारख्या योजनांना लोकांचे पाठबळ मिळाले आहे. लोकांनी विरोधी पक्षांच्या पोकळ भाषणांवर नव्हे तर सरकारच्या कामांवर विश्वास दर्शविला आहे.

 

नांदेड जिल्ह्यात महायुतीची उत्तम कामगिरी झाली आहे. तेलंगणाच्या धनशक्तीवर भोकरच्या जनशक्तीचा विजय झाला आहे. भोकरच्या जनतेने विकासाचा वारसा आणि लोकसेवेच्या परंपरेला आशीर्वाद दिला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेतृत्वाने भोकरमध्ये केवळ अशोक चव्हाण द्वेषाचा अजेंडा राबवला.. आज त्याचंच फळ त्यांना भोगावं लागतंय. प्रदेश काँग्रेसचं नेतृत्व केवळ स्वप्नरंजनात राहिले, लॉटरी वारंवार लागत नसते. महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अनपेक्षित यश मिळालं म्हणून ते हवेत राहिले..आम्ही जमिनीवर राहिलो म्हणून जिंकलो…

काँग्रेसच्या नेत्यांनी संघटनात्मक बांधणी ऐवजी मुख्यमंत्री कोण होणार, याकडेच लक्ष दिले… त्यामुळे काँग्रेस भुईसपाट झाली. मुख्यमंत्री पदाचे अनेक स्वयंघोषित दावेदार पराभूत झाले… जे कसेबसे जिंकले त्यांना विरोधी पक्षनेते पदही मिळण्याची शक्यता दिसत नाही असे अशोक चव्हाण म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *