संविधान जाळून भाजपाकडूनच बाबासाहेबांचा अपमान..
संविधान जाळून भाजपाकडूनच बाबासाहेबांचा अपमान..
मुंबई, दि. १७ नोव्हेंबर :
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय जनता पक्ष व आरएसएस यांनी सुरुवातीपासूनच विरोध केला आहे. बाबासाहेबांनी देशाला जगातील सर्वात पवित्र ग्रंथ संविधान दिले त्या संविधानाला भाजपा व आरएसएस मानत नाहीत. मनुवादी प्रवृत्तींनीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान रामलीला मैदानावर जाळून संविधान व संविधाननिर्माते बाबासाहेब यांचा अपमान केला आहे, असे प्रत्युत्तर मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिले आहे.
भारतीय जनता पक्षला खोटे बोलण्याचे प्रशिक्षण दिलेले असते त्यामुळे ते सातत्याने खोटे व अपप्रचार करणारी माहिती पसरवत असतात. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनीही तेच केले असून काँग्रेसने बाबासाहेबांचा अपमान केल्याचे सांगत आहेत. राजनाथसिंह यांना माहित असायसा हवे की संविधानाला विरोध त्यांच्या मातृसंस्थेनेच केलेला आहे. आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलण्याची भाषा भाजपा व आरएसएस खुलेआम करत आहे. ४०० पार चा नारा कशासाठी दिला होता, हे देशाची जनता विसरलेली नाही. भाजपाच्या राज्यात आजही दलित व मागासवर्गीय समाजावर सर्वात जास्त अत्याचार होत आहेत. काँग्रेस पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नेहमीच आदर व सन्मान केला आहे. तत्कालीन मुंबई प्रांतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उमेदवारी देऊन निवडून आणले व संविधानाची जबाबदारी दिली. पंडित नेहरु यांच्या मंत्रिमंडळात त्यांना कायदा मंत्रीपदाची जबाबदारी दिली. राजनाथसिंह सवयीप्रमाणे खोटे बोलले असून काँग्रेस व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल खोटी व माहिती पसरवल्याबद्दल त्यांनी माफी मागावी, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.
