लोकसभेप्रमाणे कोकणातील सर्वच मतदारसंघात भगवा फडकवा..
लोकसभेप्रमाणे कोकणातील सर्वच मतदारसंघात भगवा फडकवा..
दापोली, दि. १६ नोव्हेंबर ;
कोयनेचे समुद्रात वाहून जाणारे ६७ टीएमसी पाणी अडवण्यासाठी केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. इथ छोटे मोठे बंधारे, धरणं, रस्ते बांधण्यासाठी राज्य सरकारने कोकण विकास प्राधिकरण स्थापन केले असून या पाण्यामुळे कोकणातील तिन्ही जिल्ह्यांत बागायती होईल. कोकण सुजलाम सुफलाम होईल, इथल्या तरुणांना पुणे, मुंबईमध्ये नोकरीसाठी जाण्याची आवश्यकता राहणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि गुहागर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या.
दापोली येथे महायुतीचे उमेदवार योगेश कदम यांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून जे बसलेत ते पाहून बाळासाहेबांच्या आत्म्याला वेदना होत असतील. कोकणची जनता नेहमीच शिवसेनेसोबत राहिली. ज्या लोकांनी जनतेचा विश्वासघात केला, बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांचे बालेकिल्ले आणि गड जनतेने लोकसभेवेळी उद्ध्वस्त केले आणि शिवसेना आणि धनुष्यबाणाला मतदान केले. विधानसभा निवडणुकीतही तसाच निकाल लागणार. कोकणात एकही जागा उबाठाला मिळणार नाही. महायुतीचे भगवे येथे फडकणार, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
कोकणातील अनुशेष भरुन काढण्यासाठी सरकारने कोकण विकास प्राधिकरणाची स्थापना केली आहे. यात एमएमआरडीए, एमआयडीसी आणि एमएसआरडीसी या महामंडळांचा समावेश केला असून प्रत्येकी ५०० कोटींचा निधी त्यांच्याकडून प्राधिकरणासाठी उपलब्ध केला आहे. यातून कोकणात छोटे मोठे बंधारे, रस्त्यांची कामे केली जातील. तसेच काजू प्रक्रिया, आंबा प्रक्रिया केंद्र, उद्योग आणण्याचे काम सरकार करेल, असा शब्द मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिला. त्याचबरोबर दापोली मंडणगड हायब्रीड अँन्युटी रस्ता, हर्णे बंदराचा विकासाला निधी कमी पडू देणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. दापोलीला पर्यटनाचे नंदनवन बनवणार असून कोकणाला आंतरराष्ट्रीय नकाशावर आणायचे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
बर्फावर झोपवणार बोलणाऱ्यांना योगेश डोक्यावर बर्फ ठेवून शांतपणे विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करेल, असे टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. कोका कोला कंपनीचा प्रस्ताव महाविकास आघाडीमध्ये काहींनी कमिशनसाठी अडवून ठेवला होता. मात्र आपल्या सरकारने लोटे एमआयडीसी हा प्रकल्प आणला. यामध्ये कोकणातील भूमीपुत्रांनाच १०० टक्के नोकरी देणार असा पण योगेश कदम यांनी केला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
गुहाघर येथील महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री म्हणाले की, लाडक्या बहिणींच्या जीवनाला हातभार लावला तर विरोधकांच्या पोटात दुखलं, भीक देता का असे सांगून त्यांनी या योजनेची बदनामी केली, कोर्टात गेले मात्र कोर्टाने त्यांना चपराक लगावली. योजनेत खोडा घालणाऱ्यांना लाडक्या बहिणींनी जोडा दाखवण्यासाठी आतूर आहेत, असे ते म्हणाले. लाडक्या बहिणींवर वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना कठोर शिक्षा होईल, असा इशारा त्यांनी दिला.
सावंतवाडी येथे मंत्री दिपक केसरकर यांच्या प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी उबाठावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले की, महायुती सरकारवर रोज सकाळी उठून शिव्याशाप देणाऱ्यांनी ते मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात प्रकल्पांना स्थगिती देण्याचे काम केले. आता निवडणूक संपल्यानंतर गळ्यात कॅमेरा अडकवून त्यांना जंगलात जावे लागेल, अशी बोचरी टीका मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर केली.
ते पुढे म्हणाले की, कोकणात आपत्ती आली तेव्हा घरावरचे पत्र देखील दिले नाहीत. मुख्यमंत्री असताना त्यांनी कोकणला काही दिले नाही. बॅगा तपासल्या तर अधिकाऱ्यांना धमक्या देतात कारण त्यांना आता भान राहिलेले नाही. त्यांच्या बँगांमध्ये खोक्यांमध्ये काहीच मिळणार नाही कारण त्यांना कंटेनर लागतो, असा टोला मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता लगावला.
