भाजप नेते सरदार तारा सिंह यांचे निधन..
मुंबई, दि. 19 सप्टेंबर 2020:
भाजपचे माजी आमदार सरदार तारा सिंह यांचे सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने लिलावती रुग्णालयात निधन झाले. तारासिंह हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे त्यांना लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांची प्रकृती अचानक खालावली त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
तारासिंह यांना अनेक नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक आपल्या शोकसंदेशात म्हणतात, ‘चाळीस वर्षांहून अधिक काळ तळमळीने जनतेची कामे करणारा जनप्रतिनिधी म्हणून प्रभावी कारकीर्द असलेल्या सरदार तारा सिंह यांच्या निधनामुळे भारतीय जनता पार्टी, मुंबईचे कधीही भरून निघणार नाही असे नुकसान झाले आहे.
सरदार तारा सिंह यांच्या आठवणी जागवताना नाईक म्हणाले, ‘‘खरं तर तारा सिंह यांचे वडील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. तारा सिंह यांनी मात्र जनसेवेसाठी भारतीय जनता पार्टी आपली केली. भारतीय जनता पार्टी उत्तर पूर्व जिल्ह्याचे ते अध्यक्षही होते. आज पार्टीच्या आदर्श जनप्रतिनिधींमध्ये त्यांची गणना होते. मी भारतीय जनता पार्टी, मुंबईचा अध्यक्ष असताना तारा सिंह यांनी पहिली निवडणूक जिंकली. आपल्या मतदार संघासाठी तळमळीने काम करणारे सरदार तारा सिंह दीर्घकाळ नगरसेवक, आमदार होते. जनतेला सहज उपलब्ध असलेला जनप्रतिनिधी म्हणून ते ओळखले जात.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आपल्या शोक संदेशात म्हणतात, ‘महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष परिवारातील अतिशय ऊर्जावान व्यक्तीमत्त्व, मुंबई भाजपाचे वरिष्ठ नेता आणि मुलुंड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सरदार तारासिंहजी यांच्या निधनाचे वेदनादायी वृत्त समजले. सरदारजी पक्षातील अतिशय ऊर्जावान व्यक्तित्व होतं. त्यांनी आपलं संपूर्ण जीवन पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी आणि जनसेवेसाठी समर्पित केलं होतं. त्यांमुळेच ‘मेरा काम ही मेरी पहचान’ अशी ओळख जनमानसात त्यांच्याप्रति निर्माण झाली होती. भाजपा परिवाराच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. सरदारजींच्या जाण्याने त्यांची उणीव आम्हाला सदैव भासत राहिल.
काँग्रेसचे बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंह यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांच्या निधनाने तळमळीने काम करणारे सच्चे व्यक्तीमत्व आपण गमावले आहे. सरदार तारासिंह यांचे सर्वच पक्षातील लोकांशी चांगले संबंध होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांनी तारासिंह यांना श्रद्धांजली अर्पण केली.
