IMG-20241109-WA0201

विरोधकांची पंचसुत्री म्हणजे थापा.

परभणी, दि ९ नोव्हेंबर ;

महायुती सरकारने शेतकऱ्यांचे ७.५ एचपी वीज पंपाचे वीज बिल माफ केले. दहा आश्वासनांमध्ये शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहीर झाल्यावर विरोधक टीका करत होते. मात्र बँक खात्यात पैसे जमा झाले तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. बहिणींना १५०० रुपयांचे २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. बहिणींना लखपती करायचे असल्याचे ते म्हणाले. आपल्या योजना चोरायच्या आणि वचननामा बनवायचा ही राज्यातील पहिलीच घटना आहे. विरोधकांची पंचसुत्री म्हणजे थापा सुत्री आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

नांदेडमधील हिमायतनगर येथे महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री बोलत होते.

दोन वर्षात सरकारने लाडकी बहिण योजना, लेक लाडकी योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण, ज्येष्ठांना वयोश्री योजना, महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत दिली. आम्ही जे बोलतो ते करतो हे दोन वर्षात दाखवून दिले आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्यांना १५०० रुपयांची किंमत नाही कळणार, लाडकी बहिण योजना बंद होऊ देणार नाही. विरोधी पक्ष बोलतोय या योजनांची चौकशी लावू आणि दोषींना जेलमध्ये टाकू पण लाडक्या बहिणींसाठी जेलमध्ये जावे लागले तर एकदा नाही तर शंभरदा जायला पर्वा करणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पैनगंगा नदीवरील बॅरेजेस आणि सात पुलांना मंजुरी दिली, आता हदगाव आणि हिमायतनगरमध्ये एमआयडी देऊ. ४० वर्षांपासून रखडलेले पैनगंगा नदीवरील ७ बॅरेजेस हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने सरकारने मंजूर केले, यामुळे येथील एक लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारे पैनगंगा नदीवरील ७ पूल मंजूर केले. वसंत सहकारी साखर कारखाना दोन वर्षापासून चालू केला असून येथील शेतकऱ्यांना फायदा झाला आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *