भाजप नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही!
मुंबई, दि. २९, ऑक्टोबर :
नवाब मलिकांच्या उमेदवारीला भाजपा तीव्र विरोध असतानाही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर नवाब मलिक यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाने आपली नाराजी व्यक्त करत नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही’, असा पुनरुच्चार मुंबई भाजप अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी केला.
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार शेलार म्हणाले, ‘भाजपची भूमिका सुरुवातीपासून स्पष्ट राहिली आहे. महायुतीमधील सर्व पक्षांनी आपापले उमेदवार आपणच ठरवायचे आहेत. विषय फक्त राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक यांना दिलेल्या उमेदवारीबद्दल आहे. यासंदर्भात भाजपची भूमिका याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मीही वारंवार स्पष्ट केली आहे. आता पुन्हा एकदा सांगतोय, भाजप नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही. आमची भूमिका दाऊद आणि दाऊदशी संबंधित केससंदर्भातील व्यक्तीच्या प्रचाराची नाही’, असे आशिष शेलार म्हणाले.
सना मलिकांचे काय?
नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांना अणुशक्तीनगर मतदारसंघातून देण्यात आलेल्या महायुतीच्या उमेदवारीबाबत विचारले असता आशिष शेलार म्हणाले, यासंदर्भातील कोणताही पुरावा किंवा माहिती समोर येत नाही, तोपर्यंत महायुतीचा उमेदवार हाच भाजपचा उमेदवार आहे, याबाबत दुसरा प्रश्न उपस्थितच होत नाही.
