आदित्य ठाकरेंच्या विरोधात शिंदेसेनेचे मिलिंद देवरा.
मुंबई, ता. २९ ऑक्टोबर;
शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी आज वरळी विधानसभा मतदार संघात महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीतील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, ‘आरपीआय’च्या हजारो कार्यकर्त्यांनी प्रचंड रॅलीतून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना सचिव किरण पावसकर, अँड. सुशीबेन शाह, माजी नगरसेवक दत्ता नरवणकर उपस्थितीत होते.
मिलिंद देवरा हे शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार आहेत. वरळी हा मुंबईतील कॉस्मोपॉलिटन मतदार संघ आहे. या मतदार संघात सर्वच मागील पाच वर्षात शुन्य विकास झाला. वरळीतील स्थानिक नागरिकांचे व्हीजन हेच मुख्यमंत्री एकनमाथ शिंदे यांचे व्हीजन आहे असे खासदार देवरा म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: या मतदार संघाचे उमेदवार आहेत. वरळीकर जनता आणि मुख्यमंत्री यांच्यातील आपण एक माध्यम आहोत, अशी भावना खासदार देवरा यांनी व्यक्त केली. ही लढाई कोणाला पराभूत करण्यासाठी नाही तर वरळीकरांना विजयी करण्यासाठी असल्याचे देवरा म्हणाले.
लोकांच्या प्रेमामुळे दोन वेळा लोकसभेवर गेलो. दक्षिण मुंबई आणि मुंबई ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी असल्याने वरळीकरांचे काम करण्यासाठी सदैव उपलब्ध असल्याचे ते म्हणाले. सामान्य मुंबईकरांसमोर सर्वात मोठी समस्या घराची आहे. ती सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मागील दोन वर्षांत अनेक निर्णय घेतले. घाटकोपरमधील रमाबाई नगर, वरळीतील बी.डी.डी चाळींचा पुनर्विकासाचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी मार्गी लावला, असे खासदार देवरा म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, वरळीकरांचा, सर्वसामान्य मुंबईकरांचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर खूप विश्वास आहे. मागील पाच वर्षात इथून निवडून गेलेला आमदार मतदार संघात फिरकला नाही. या ठिकाणी त्यांचे साधे कार्यालय नव्हते. मी वरळीकरांना न्याय देण्यासाठी आलेलो आहे. माझी कोणाशीही व्यक्तिगत दुश्मनी नाही. वरळीकर विकासापासून वंचित आहेत. वरळीकरांचे घरांचे स्वप्न पूर्ण झाले नाही. त्यांच्या समस्या, आकांक्षा समजून त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पोहचवण्यासाठी मी इथ आलोय. 20 नोव्हेंबर रोजी मतदारांनी पाच मिनिटे मुख्यमंत्र्यांसाठी काढावीत, त्याबदल्यात मुख्यमंत्री तुम्हाला त्यांच्या आयुष्यातील पाच वर्ष देतील, असा विश्वास देवरा यांनी यावेळी व्यक्त केला.
मागील पाच वर्ष इथले आमदार गायब होते. मात्र दोन वर्षात आमच्या सरकारने बी.डी.डी चाळ, कोळीवाड्याचा विषय, पीएमजीपी बिल्डिंगची कामे केली. देवरा यांनी दोन वेळा लोकसभेत दक्षिण मुंबईचे प्रतिनिधीत्व केले. त्यामुळे वरळीतील जनतेशी त्यांचे भावनिक नाते जोडलेले आहे. इथल्या समस्या सोडवण्यासाठी देवरा नक्कीच वरळीकरांना न्याय देतील. देवरा मोठा मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. ज्यांना मागील पाच वर्ष निवडून दिले ते वरळीकरांसाठी नॉट रिचेबल होते, अशी टीका खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर केली.
