छगन भुजबळांचा येवल्यातून उमेदवारी अर्ज दाखल.

0
IMG-20241024-WA0095

येवला, दि.२४ ऑक्टोबर :-

वीस वर्ष येवल्याच्या विकासाठी मी मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत असून येवला मतदारसंघातील प्रत्येक घटकाचा विकास करण्यासाठी आपण परिपूर्ण प्रयत्न केले. जात, पात,धर्म, पक्ष माझ्यासाठी सर्व गौण असून येवल्याचा विकास हेच आपल्यासाठी सर्वकाही असल्याचे प्रतिपादन अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

मंत्री छगन भुजबळ यांनी आज भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय आठवले गट घटक पक्ष महा युतीच्या वतीने हजारो नागरिकांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढत येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर एन्झोकेम शाळेच्या मैदानावर त्यांनी उपस्थित बांधवाना संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते. मंत्री छगन भुजबळ यांनी प्रथम सर्व महापुरुषांना अभिवादन करत रॅलीला शुभारंभ केला.

यावेळी मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, येवलेकरांच्या आग्रहास्तव जेव्हा मी येवल्यातून पहिल्यांदा उमेदवारी केली. त्यावेळी रस्ते, पाणी, वीज, आरोग्य असे कितीतरी प्रश्न उभे होते. प्रथमतः पाण्याच्या प्रश्नावर आपण प्राधान्य दिले. रस्ते वीज पाणी या पायाभूत सुविधांचा परिपूर्ण विकास आपण करण्याचा प्रयत्न केला. आज मांजरपाडा, पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालवा, यासह जलसिंचनाच्या अनेक कामांमुळे येवल्याची परिस्थिती बदलली आहे. जी लोक म्हणत होती की पूरपाणी येवल्याला मिळणे शक्य नाही. त्यांना आज सांगायचे आहे की यदांच्या पावसळ्यात दुसऱ्यांदा येवला तालुक्याला पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याच्या माध्यमातून पाणी उपलब्ध होऊन सर्व बंधारे भरण्यात आले आहे. त्यामुळे आपला विश्वास अधिक दृढ झाला आहे. आपण एवढ्यावर थांबणार नाही तर पार गोदावरी प्रकल्पाच्या माध्यमातून येवल्याला बारमाही पाणी उपलब्ध करून देऊ. आगामी दोन वर्षात हा प्रकल्प देखील मार्गी लावला जाईल असे त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या इतिहासाची साक्ष देणारी शिवसृष्टी आपण साकारली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मुक्तीभूमीचा आपण विकास केला. अडतीस गाव पाणी पुरवठा योजना, लासलगाव विंचूरसह १६ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना साकारल्या तसेच धुळगावसह १७ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, राजापूरसह ४१ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना साकारल्या जात आहे. येवला शहराला २४ तास पाणी पुरवठा होण्यासाठी येसगाव साठवण तलावातून पाणी आण्यासाठी प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी आहे. आगामी काळात येवल्याला दररोज पाणी मिळण्यासाठी आपले प्रयत्न असून येत्या काळात संपूर्ण मतदारसंघातील प्रत्येक घरात नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध होईल. कुठल्याही महिलेला पाण्यासाठी पायपीट करावी लागणार नाही असा शब्द देतो.

येवला विधानसभा मतदारसंघात आपण हजारो कोटी रुपयांची विकास कामे केली. आगामी काळात आपल्याला अधिक कामे करायची आहे. हे सर्व शक्य होतंय ते तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे होते आहे. विकासाला कुठलीही मर्यादा नसते. सर्व समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण काम करतो. आगामी काळात तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी येवल्याच्या विकासाला तुमच मत द्यायचे आहे. आता थांबायचे नाही कुठल्याही भूलथापाना बळी न पद येवल्याच्या भविष्यासाठी आशिर्वाद द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने मतदारसंघातील नागरिक सहभागी झाले. यावेळी भुजबळ साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है यासह विविध घोषणा दिल्या. रॅलीदरम्यान महाराष्ट्राचा जननायक येवल्याचा जलनायक अशा आशयाचे फलक नागरिकांनी झळकावले. महिलांनी फुगडी खेळत आनंद उत्सव साजरा केला. तर ढोल ताशाच्या तालावर अनेकांनी ठेका धरल्याचे यावेळी बघावयास मिळाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *