मुंबईच्या पाच मार्गावरील टोल माफ!
मुंबई, दि. १४ ऑक्टोबर ;
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपा युती सरकारने लोकप्रिय घोषणांचा सपाटाच लावला आहे, लाडकी बहिण योजनेनंतर आता मुंबईतील वाहन चालक मालकांना खुष करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतल्या पाच प्रवेश मार्गांवरील पथकर हलक्या वाहनांसाठी माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. आज १४ ऑक्टोबरला मध्यरात्री बारा वाजेपासून या निर्यणाची अंमलबजावणी होईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
हलकी वाहने, शाळेच्या बसेस आणि एसटी बसेस यांना ही पथकर सूट राहील. सायन पनवेल महामार्गावर वाशी येथे, लालबहादूर शास्त्री रस्त्यावर मुलुंड येथे, पूर्व द्रुतगती मार्गावर मुलुंड येथे ऐरोली पुलाजवळ, पश्चिम द्रुतगती मार्गावर दहिसर येथील पथकर नाक्यावर याची अंमलबजावणी होईल. पथकरातून सूट दिल्यामुळे राज्य रस्ते विकास महामंडळास द्याव्या लागणाऱ्या भरपाईसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोल माफ करावा अशी मागणी मागील अनेक वर्षे केली जात होती. भाजपा शिंदे सरकारने आज टोलमाफी जाहीर केल्याने अनेक स्तरातून याचे स्वागत केले जात आहे.
