महाभ्रष्ट युती सरकारचा ‘गद्दारांचा पंचनामा’ प्रसिद्ध.

0
IMG-20241013-WA0138

मुंबई, दि. १३ ऑक्टोबर;

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ज्यांनी विरोध केला त्याच विचाराचे लोक आज सत्तेत आहेत. या सरकारच्या भ्रष्टाचारामुळेच मालवणमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून विटंबना करण्याचे पाप केले, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप माफी मागितली नाही. शिवाजी महाराज, शाहू, फुले व आंबेडकरांच्या महाराष्ट्राला कलंक लावण्याचे पाप शिंदे फडणवीस सरकारने केले आहे. महायुती सरकार हे गुजरात धार्जिणे आहे, या सरकारला सत्तेतून बाहेर काढणे, हेच महाविकास आघाडीचे लक्ष्य आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

वांद्रे पश्चिम येथील हॅाटेल ताज लॅंडस एन्डमध्ये महाविकास आघाडीने राज्यातील महाभ्रष्ट युती सरकारच्या काळ्या कारभाराचा ‘गद्दारांचा पंचनामा’ प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खा. वर्षा गायकवाड, खा. संजय राऊत, खा.अरविंद सावंत, खा.सुप्रिया सुळे, खा.अनिल देसाई, आ.आदित्य ठाकरे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे आदी उपस्थित होते.

यावेळी पत्रकार परिषदेला संबोधित करताना नाना पटोले पुढे म्हणाले की, माजी मंत्री आमदार बाबा सिददीकी यांच्या हत्येने महाराष्ट्र हादरला. शाळेतील मुली सुरक्षित नाहीत, महिला सुरक्षित नाहीत. राज्यातली जनता सुरक्षित नाही आता तर सत्तेतील लोकही सुरक्षित नाहीत. कायदा सुव्यवस्था बिघडली आहे आता महायुतीच्या मंत्र्यांचे राजीनामे मागितले जाणार नाहीत तर जनताच यांना सत्तेतून खाली खेचेल. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना असंवैधानिक पद्धतीने पदावर बसवले आहे, काँग्रेसने त्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. राजकीय फायद्यासाठी सत्ताधारी पक्ष त्यांच्या विचारांच्या अधिकाऱ्यांना महत्वाच्या पदावर बसवून लोकशाहीचा खुन करण्याचे काम करत आहे, रश्मी शुक्ला हे त्याचेच एक उदाहरण आहे. महायुती सरकारने शेतकऱ्यांना मदत केली नाही, पीक विम्यातून शेतकऱ्यांचा फायदा होत नाही. अतिवृष्टीनंतर केंद्राचे पथक आंध्र प्रदेशात गेले पण महाराष्ट्रात आले नाही. महाराष्ट्रात दररोज ७ शेतकरी आत्महत्या होत आहेत. तरुण मुले शिक्षण घेऊन नोकरीची प्रतिक्षा करत आहेत पण ह्या सरकारने सर्व उद्योग व रोजगार गुजरातला पळवले आहेत, आता हे सरकार घालवले पाहिजे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यावेळी म्हणाले की, महायुती सरकारने मंत्रिमंडळात धडाधड निर्णय घेतले पण त्यातील किती निर्णयांची अंमलबजावणी होईल. महाराष्ट्राच्या प्रशासनाचा देशात लौकिक होता पण महायुती सरकराच्या काळात ही प्रशासकीय व्यवस्था उद्ध्वस्थ झाली आहे, त्याची महाराष्ट्राला मोठी किंमत मोजावी लागत आहे. प्रशासन व्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्यांच्या हातून महाराष्ट्र वाचवावे लागेल आणि त्यासाठी मविआ प्रयत्न करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *