अजित पवार बारामतीतूनच लढणार..
मुंबई, दि. ८ ऑक्टोबर;
अजित पवार कोणत्या मतदारसंघातून लढणार यावर पडदा पडला आहे. अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार आहेत अशी अधिकृत घोषणा पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी केली आहे.
माध्यमांशी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखाली मागील एक वर्षात महायुतीने क्रांतीकारी निर्णय घेतले आहेत. या निर्णयामुळे नक्कीच प्रत्येक वर्गाला हे आमचे सरकार परत आले पाहिजे असे वाटत आहे.
रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी माझे बोलणे झाले आहे, त्यांच्या मनात काहीच संभ्रम नाही. फक्त काही स्थानिक प्रश्न होते त्यावरून काही प्रश्न निर्माण झाले होते परंतु ते आता अजित पवार व आम्ही सगळे बोलणार आहोत तेव्हा हे प्रश्न सुटतील. निवडणूक कालावधीत प्रत्येक पक्षामध्ये काही ना काही घडामोडी घडत असतात. आता फक्त आऊटगोईंग दिसतेय पण काही दिवसात इनकमिंग सुरू होणार आहे असेही प्रफुल पटेल यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट केले.
