लाडकी बहीण नाही तर ‘सुरक्षित बहीण’ हवी!
सावंतवाडी, दि.५ ऑक्टोबर;
राज्यातील महायुती सरकारच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. सरकारच्या कार्यकाळात राज्यात शेतकरी, विद्यार्थी, युवक त्रस्त आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. महाराष्ट्रातील महिला सुरक्षित नाहीत, नुकतच देवगड येथे एक तरुणीचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. खरेतर ‘लाडकी बहीण’ नाही तर ‘सुरक्षित बहीण’ ही काळाची गरज ठरली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेवेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे पाटील बोलत होते. जयंत पाटील पुढे म्हणाले की, महाराष्ट्र नेहमी लढणाऱ्यांच्या बाजून उभे राहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी येथील जनतेत चेतवलेले स्फुलिंग आजपर्यंत जागं आहे. त्यामुळे महाराजांच्या पुतळा उभारण्यात झालेला भ्रष्टाचार कधीच मान्य केला जाणार नाही. त्याचं प्रायश्चित्त अटळ आहे. कार्यकर्ता जपण्याची परंपरा या मतदारसंघाने पहिली आहे. मात्र मागच्या काही वर्षात याला ग्रहण लागले आहे. ते मोडून काढण्याची जबाबदारी आपली आहे.
विद्यार्थ्यांच्या गणवेशामध्ये १७०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आता समोर आला आहे. याचा लाडका कंत्राटदार जळगावात बसला आहे. अर्ध शैक्षणिक वर्ष संपलं तरीही अद्याप काही शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्याप्रमाणे पर्यटनाचा विकास व्हायला हवा होता तसा विकास झालेला नाही. काजू, आंबा या फळांना आधारभूत किंमत मिळत नाही. कोकण रेल्वेच्या सुविधा वाढल्या नाहीत, नवीन स्टेशन झाले नाहीत, असेही जयंत पाटील म्हणाले.
कोकणाने भाईसाहेब सावंत यांचं कार्य पाहिलं आहे. शिवरामराजे भोसले यांचाही आदर्श आपल्यासमोर आहे. समाजवादी विचारसरणीचे जयानंद मटकर यांची आठवण आपल्या मनात आहे. अर्चनाताई घारे यांनी १६ ऑगस्टला जाणीव जागर यात्रेचा प्रारंभ केला होता. त्याचा समारोप सर्वांच्या साक्षीने आज झाला. गावोगावी जाऊन लोकांचे प्रश्न जाणून घेण्याचे काम त्यांनी केले. लोकांमध्ये समरूप होणारा आपला लोकप्रतिनिधी हवा हे तुम्ही लक्षात घ्या. स्वाभिमानी कोकणवासियांनी महाविकास आघाडीला आशीर्वाद द्यावा. असेही जयंत पाटील म्हणाले.
