मेट्रोमुळे पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होईल.

0
IMG-20240118-WA0099

पुणे, दि. ३० सप्टेंबर :

पुणेकरांच्या नावाला साजेसे असे स्वारगेट येथील मेट्रोचे स्थानकाचे काम झालेले आहे.जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यान मेट्रोच्या भूमिगत रेल्वेचे लोकार्पण होत असून स्वारगेट ते कात्रज दरम्यान मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन होत आहे. पुण्याची वाहतूक कोंडी सोडविण्याकरीता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याकरीता मेट्रोचे विविध टप्पे पूर्ण करण्यात येत आहेत. शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान टाटा कंपनीच्या मदतीने काम करण्यात येत आहे. पुण्यात विविध सार्वजनिक विकासाची कामे सुरु असताना पुणेकरांना त्रास होत आहे, ही गोष्ट मान्य करतो. परंतु, आगामी ५० ते १०० वर्षाचा विकास या माध्यमातून होणार आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रो टप्पा १ चा दक्षिणी विस्तार स्वारगेट ते कात्रज मार्गिकेचे भूमिपूजन आणि पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्थानक मार्गावरील प्रवासी सेवेचा ऑनलाईनने हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी अजित पवार बोलत होते.

अजित पवार पुढे म्हणाले की, भिडेवाडा या ऐतिहासिक स्मारकाकरीता उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन राज्य शासनाने जागा ताब्यात घेतली आहे. जागेच्या भूसंपादनाकरीता अंदाजे २०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याठिकाणच्या भूसंपादनामुळे बाधितांना योग्य तो मोबदला देण्याकरीता राज्य शासनातर्फे पुढाकार घेण्यात येईल. भिडेवाडा स्मारकाकरीता १० कोटी रुपयांची तरतूद पुणे महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे. भिडेवाडा येथील स्मारकाचे काम उत्तम व दर्जेदार होईल, अशी ग्वाही पवार यांनी यावेळी दिली.

मोहोळ म्हणाले, केंद्र शासनाच्यामदतीने पुणे शहराला मेट्रो, आयुर्वेदिक महाविद्यालय, नवीन विमानतळाचे टर्मिनल, स्मार्ट सिटी, चांदणी चौकातील पूल, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ई-बस, पुणे ते कोल्हापूर, पुणे ते हुबळी वंदेभारत एक्सप्रेस, पुण्यात ३३ किमी मेट्रोचे मार्ग पूर्ण झाले आहेत. महिला सक्षमी करणाकरीता बेटी-बचाव, बेटी पढाव, लखपती दीदी अशा योजना राबविण्यात येत असल्यामुळे त्या आत्मनिर्भर होत आहेत, असेही मोहोळ म्हणाले.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले, क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य तसेच भिडेवाडा स्मारक येथील नूतन इमारतीच्या आराखड्याबाबत माहिती देऊन मंत्री भुजबळ म्हणाले, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी विविध शिक्षण, आरोग्य अशा सामाजिक सुधारणा केल्या. भिडेवाडा येथील स्मारकाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोंदी यांच्या हस्ते भूमिपूजन होत असल्याचा आंनद आहे, असेही भूजबळ म्हणाले.

मंत्री चंद्रकांत पाटील प्रास्ताविकात म्हणाले, पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्थानक मार्गावर कसबा पेठ, मंडई, स्वारगेट असे रहदारीचे भाग जोडल्याने पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासोबत व्यापारालाही चालना मिळणार आहे. स्वारगेट येथून शहरातील विविध भागात जाणे शक्य होणार आहे. भिडेवाडा येथील स्मारक हा आपल्या श्रद्धेचा विषय मार्गी लागला आहे, असेही पाटील म्हणाले.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *