संजय गायकवाड ही विषवल्ली मुळापासून उखडून फेका.
मुंबई, दि. १७ सप्टेंबर ;
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा आमदार संजय गायकवाडच्या बेताल वक्तव्याचा काँग्रेस पक्ष निषेध करतो आणि राज्यात जर कायद्याचे थोडे बहुत राज्य शिल्लक असेल तर तातडीने संजय गायकवाडच्या मुसक्या आवळून महायुती सरकारने या विषवल्लीला मुळापासून उखडून फेकावे अशी मागणी माजी महसूल मंत्री व काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
बेताल आमदार संजय गायकवाडांच्या विधानावर संताप व्यक्त करत बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्यांची वृत्ती आणि राहुल गांधींची जीभ कापण्यासाठी बक्षीस जाहीर करणाऱ्याची वृत्ती एकच आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधींना मारण्याची धमकी दिल्याने त्यांचा आवाज बंद होणार नाही. राहुल गांधींनी आजवर कायम संविधान रक्षणाची भूमिका घेतली आहे. ते जे बोललेच नाही ते त्यांच्या तोंडी घालून त्यांना बदनाम करण्याचे जे षडयंत्र सुरू आहे, ते कधीही यशस्वी होणार नाही.
खासदार राहुल गांधी यांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणात नाही, काँग्रेसचे कोट्यवधी कार्यकर्ते राहुल गांधींची ढाल आहेत. महत्वाचे म्हणजे या देशातील सामान्य जनता राहुल गांधी यांच्या सोबत खंबीरपणे उभी आहे असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.
