मनोज जरांगेंमध्ये अहंकार!
मुंबई, दि. ९ सप्टेंबर-
मराठा समाजाने पाठबळ देऊन तुमच्यातील अंगार फुलवण्याचा प्रयत्न केला. मात्र तुमच्यात एवढा अहंकार आलाय कि तोच तुमचा वैचारिक ऱ्हास केल्याशिवाय राहणार नाही, असे सणसणीत प्रत्युत्तर भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिले आहे.
दरेकर म्हणाले कि, मी भंगार आहे कि अंगार आहे हे महाराष्ट्रातील मराठा समाजाला नीट माहित आहे. परंतु जरांगे तुमच्यात अहंकार आलाय. तुमच्यावर कुणी प्रश्न विचारायचे नाही, प्रतिक्रिया द्यायची नाही. दिल्या कि तुम्ही शिव्या देणार. हे मराठा समाजाला अजिबात आवडत नाही. तुम्ही खुशमस्कऱ्यांच्या धुंदीत आहात. त्यामुळे तुम्हाला ते दिसणार नाही. मराठा समाजाने पाठबळ देऊन तुमच्यातील अंगार फुलवण्याचा प्रयत्न केला. मात्र तुमच्यात एवढा अहंकार आलाय कि तोच तुमचा वैचारिक ऱ्हास केल्याशिवाय राहणार नाही.
दरेकर पुढे म्हणाले कि, आम्ही गरीब मराठ्यांच्या मुलांसाठी जे काय करतोय याची जरांगेंना कल्पना नाही. त्याच्या एक टक्के मराठा समाजाच्या मुलांसाठी तुम्ही काय केले असेल तर सांगा. केवळ भावनिक बोलायचे आणि मराठा समाजाला गुमराह करायचे हे काम जरांगेंचे सुरू आहे. ना कधी रचनात्मक काम केले आणि कधी करू शकत केवळ वलग्ना करायच्या, सरकारवर कुणाची तरी सुपारी घेऊन बोलायचे. जरांगेंनी मराठा समाजाला काय दिले याचा लेखाजोगा मांडावा, माझी तयारी आहे आपण काय केले आणि मी काय केले हे लोकांसमोर येईल, असे आव्हानच दरेकरांनी जरांगे पाटील यांना दिले.
