पवार साहेब जहाँ खड़े होते है, लाईन वहीं से शुरू होती है!
कोल्हापूर, दि. ४ सप्टेंबर;
समरजितसिंह घाटगे यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे. शरद पवार स्वतः उपस्थित आहेत हा संदेश कागल विधानसभेला पुरेसा आहे. लोकसभेत ज्यांनी तुतारी हाती घेतली त्या सर्वांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. आता कागलच्या इतिहासाची नव्याने सुरुवात होत आहे असे त्यांनी उपस्थितांना आश्वासित केले. शरद पवार वस्तादांचे वस्ताद आहेत, शेवटचा एक डाव त्यांनी राखून ठेवलेला असतो. बरेच लोक पक्ष सोडून गेले पण लक्षात ठेवा “पवार साहब जहाँ खडे होते हैं, लाईन वहीसे शुरू होती हैं.” हा डायलॉग मारून राष्ट्रवादीतून फुटून गेलेल्या लोकांना जयंत पाटील यांनी इशारा दिला.
भाजपचे कागल विधानसभेचे नेते समरजीत राजे यांनी खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार भाषण करत उपस्थितांची मने जिंकली.
समरजितसिंह यांनी गेली १० वर्षे अविरतपणे कार्य केले. कारखाना अतिशय आदर्शपणे चावलेला आहे. सत्ता असो वा नसो कार्यरत राहण्याचा बाणा त्यांनी स्वाभिमानाने जपला आहे. ते व्यवसायाने सीए आहेत. विरोधकांची वजाबाकी त्यांना व्यवस्थितपणे करता येते. हिशोब चोख ठेवणारे समरजितसिंह मतदारसंघात विकास घडवतील हा मला विश्वास आहे असे ते म्हणाले.
ही छ्त्रपती शाहू महाराजांची भूमी आहे. या भूमीने सदैव समतेचा पुरस्कार केला. दुर्दैवाने या भूमीतील काही लोकं धर्मांध शक्तीच्या बाजूला जाऊन बसली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. इतके सुमार काम करणारा शिल्पकार अद्याप फरार आहे. तो नक्की कोणाचा मित्र आहे? असा सवाल उपस्थित करताना या सरकारच्या काळात भ्रष्टचाराने परिसीमा गाठली आहे असा आरोप त्यांनी केला.
छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत लुटले नाही असा कांगावा करत आहेत. कारण गुजरातचे नाव काढले की सत्ताधारी घाबरत आहेत. त्यामुळेच महराजांचा इतिहास बदलण्याचे पाप करत आहेत अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
