मोदींचा वाढदिवस ‘असा’ झाला ट्रेंड !
मुंबई, दि. 17 सप्टेंबर:
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना सोशल मीडियावर मात्र त्यांच्या विरोधात जोरदार मोहिम चालली. विरोधककांकडू राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून मोदींचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सोशल नेटवर्किंगवर या ट्रेंडला तुफान प्रतिसाद मिळताना दिसला. मोदींचा वाढदिवस सुरु झाल्यानंतर रात्री बारानंतर काही तासांमध्ये #राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस आणि #NationalUnemploymentDay हे हॅशटॅग भारतामध्ये ट्रेण्ड होऊ लागले.
करोनाच्या कालावधीमध्ये लाखो लोकांचे रोजगार गेले असून देशातील बेरोजगारांची संख्या वाढल्याचे चित्र दिसत आहे. त्यात मोदी सरकारने दिलेली आश्वासनांची आठवण करुन देत #राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस हा हॅशटॅग वापरुन मोदी सरकारला प्रश्न विचारण्यात आले. #राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस व #NationalUnemploymentDay या हॅशटॅगवर सकाळीच 12 लाखांपेक्षा जास्त ट्विट करण्यात आले होते.
देशातील बेरोजगारीवर तरुण वर्गात असलेला संताप यानिमित्ताने उफाळून आला होता. 45 वर्षातील सर्वात मोठी बेरोजगारी देणारा, नोक-या नष्ट करणारा पंतप्रधान असे ठपके ठेवत नेटीझन्सने मोदींना ‘दाढी नाही रोजगार वाढवा’ असा खोचक सल्लाही दिला.देशातील अधोगतीला मोदीच जबाबदार असल्याचा आरोपही करण्यात आला.
भाजपच्या वतीने मोदींचा हा वाढदिवस ‘सेवा दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. अन्नवाटप, मास्क वाटप, सॅनिटायझर आणि औषध वाटप करण्यासोबतच रक्तदान शिबिरांचे आयोजन करून भाजपाने हा वाढदिवस साजरा केला.
