बदलापूर प्रकरणाचे विरोधी पक्षांकडून राजकारण.

0
IMG-20240824-WA0108

महाड, दि. २४ ऑगस्ट –

एका चिमुरडीवर अत्याचार होतो आणि त्याचे घाणेरडे राजकारण सुरू असून हे निंदनीय आहे. त्याचा आम्ही धिक्कार, निषेध करतो. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या जाणीवा, संवेदना मेलेल्या आहेत, अशी बोचरी टीका भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी महाड येथे जाणीव जागर या कार्यक्रमातून केली.

 

महिला अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीच्या नेत्यांची दुतोंडी भुमिका राज्यातील जनतेसमोर उघड करण्यासाठी आणि बदलापूर प्रकरणातील पीडितेला न्याय देण्यासाठी भाजपच्या वतीने जाणीव जागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस बिपीन म्हामुणकर, जिल्हा उपाध्यक्ष जयवंत दळवी, महाड तालुकाध्यक्ष निलेश देवगिरकर, तालुका सरचिटणीस अनिल मोरे, महेश शिंदे, तालुका उपाध्यक्ष चंद्रजित पालांडे, युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अक्षय ताडफळे, प्रदेश सरचिटणीस मंजुषा कुदृमती, तालुका अध्यक्षा मंजुषा जोशी यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी बदलापूरला जी घटना झाली तीचे राजकारण करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने केला आहे. लाडकी बहीण योजनेला जो उदंड असा प्रतिसाद मिळतोय त्यामुळे उबाठा, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी धास्तावले असून त्यातूनच त्यांनी बंदचे आवाहन केले होते. महाराष्ट्राचे मणिपूर होतोय की काय असे भाकीत शरद पवारांनी वर्तवले होते. त्यामुळे राज्यात अशांतता, सामाजिक सुरक्षितता पसरतेय. हा केवळ योगायोग आहे की नियोजित डाव आहे. यांच्या हिंसक प्रवृत्ती निर्माण करण्याला महाराष्ट्रातील जनतेने बळी पडू नये, असे आवाहन दरेकर यांनी केले.

दरेकर पुढे म्हणाले की, कोलकाता येथे एका महिला डॉक्टरवर बलात्कार झाला त्याचा साधा निषेध उबाठा, काँग्रेस किंवा शरद पवार गटाने केला नाही. बदलापूरची झालेली घटना ही दुर्दैवीच आहे. त्याचे समर्थन कुणी करणार नाही. परंतु सरकारने सर्व प्रकारच्या ताकदीने कारवाया केल्या आहेत. आरोपीला अटक केली. निष्काळजीपणाला जबाबदार धरून अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. आरती सिंग या आयजी दर्जाच्या ज्या आयपीएस महिला अधिकारी आहेत त्यांचे विशेष तपास पथक नेमले. ज्यांनी कसाबला फाशी देण्यास भाग पाडले त्या उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली. ज्या तातडीने गोष्टी करायच्या आहेत त्या सरकारने केल्या आहेत. परंतू याचे राजकारण या नालायक आणि नादान महाविकास आघाडीला करायचे असल्याचा आरोपही दरेकरांनी केला.

दरेकरांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यात घडलेल्या घटनांचा पाढाच वाचला. तसेच यांना एवढ्या संवेदना असत्या तर निर्भया निधीसाठी जी वाहने घेतली होती ती या मंत्र्यांनी आपल्या सुरक्षेच्या ताफ्यासाठी वापरली नसती. विजय वडेट्टीवार, सुनील केदार, सुभाष देसाई यांच्या ताफ्यात माझ्या बहिणी, लेकिंसाठी जी वाहने आणली होती ती स्वतःच्या सुरक्षेसाठी वापरली. दस्तूरखुद्द सुप्रिया सुळे यांच्या ताफ्यातही निर्भयाचे वाहन होते. तेव्हाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. पण आम्ही कधी आंदोलन, राजकारण केले नाही, असेही दरेकर म्हणाले.

 

यावेळी दरेकर यांनी युपीएचे २००४ ते २०१४ या काळात सरकार असताना घडलेल्या घटनांचीही यादी वाचली. तसेच एका चिमुरडीवर अत्याचार होतो आणि त्याचे घाणेरडे राजकारण अशापद्धतीने करायचे हे निंदनीय असून आम्ही त्याचा निषेध करतो. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या जाणीवा, संवेदना मेलेल्या आहेत. म्हणून जाणीव जागर या खऱ्या संवेदना आम्हाला आहेत. एवढ्या घटना घडून आम्ही कधीच त्याचे राजकारण, आंदोलन केले नाही. अशा गोष्टींचा आपल्या राजकीय लाभासाठी उपयोग करायचा नसतो हे महाविकास आघाडीतील नेत्यांना कळत नाही. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने यांच्या झोपा उडल्या असल्याने असे बेताल आणि दिशाहीन झाल्या सारखे वागताना दिसताहेत, अशी टीकाही दरेकरांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *