बदलापूरच्या शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार.
ठाणे, दि. २१ ऑगस्ट ;
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर (पूर्व) येथील एका शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी शाळेतील मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले असून मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांना सेवेतून कमी करण्यात आले आहे. तसेच पोलीस निरीक्षकांची तात्काळ बदली करण्यात आली आहे. संस्थाचालकांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत .
संतप्त जमावाने बदलापूर येथे रेल रोको आंदोलन छेडले यावेळी तुरळक दगडफेकही झाली. लोहमार्ग पोलीस आयुक्तांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोपीला कडक शासन करण्यात येईल, असे जाहीर करुन जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालविण्याचे निर्देश दिले आहेत. सखी सावित्री समित्या शाळांमध्ये स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते तपासण्याचे निर्देश दिले आहे. झालेल्या घटनेबद्दल संस्थेने माफी मागितली आहे.
कायदा व सुव्यवस्था कोणीही हातात घेवू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून या घटनेची गंभीर दखल घेतली असून जिल्हाधिकारी अशोक शिनगारे स्वतः संपूर्ण घटनेबाबत लक्ष ठेवून आहेत.
