महायुती सरकारवर भाजपा-RSS चा कंट्रोल, शिंदे फक्त मुखवटा:
लातूर, दि. ११ ऑगस्ट :
महायुती सरकारवर भाजपा व आरएसएस चा कंट्रोल आहे, एकनाथ शिंदे हे केवळ मुखवटा आहेत. मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुलाल उधळला पण त्यांनी हा गुलाल का उधळला हे जाहीर केले नाही. जरांगे पाटील व त्यांच्यात काय बोलणी झाली हे आम्हाला माहित नाही. सर्व पाप सरकारने करायचे आणि खापर विरोधी पक्षावर फोडायचे हा त्यांचा अजेंडा आहे. राज्यात व केंद्रात भाजपाचे सरकार असताना आरक्षण देण्यापासून त्यांना कोणी थांबवले, असा प्रश्न विचारून त्यांना आरक्षण द्यायचे नाही तर दोन्ही समाजात भाडंणे लावायची आहेत. फोडा व राज्य करा या ब्रिटीश नितीचा वापर भाजपा करत आहे. मनुवादी व्यवस्था हवी की शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार हवा याचा विचार जनतेने करायचा आहे. असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
काँग्रेसने लातूर येथे लातूर शहर, लातूर ग्रामीण, धाराशीव आणि बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठका घेऊन विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर लातूर येथे मराठवाड्यातील नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार सोहळा व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीने एक जागा जिंकली पण विधानसभा निवडणुकीला मात्र मराठवाड्यातून महायुतीचा सुपडासाफ करा. विधानसभा निवडणुकीत मविआ १८५ पेक्षा जास्त जागा जिंकेल व राज्यात काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष असेल. काँग्रेस मविआचे सरकार सत्तेत आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही घेतल्या जातील असे नाना पटोले म्हणाले.
विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, कोणी कितीही मोठे असले तरी जनतेपेक्षा कोणीही मोठा नाही, हे नांदेडच्या जनतेने दाखवून दिले आहे आणि कोणी कितीही मोठा नेता काँग्रेस पक्ष सोडून गेला तरी फरक पडत नाही, कारण जनता काँग्रेसच्या पाठीशी आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालात मराठवाड्याने मानाचा तुरा लावला आहे आता विधानसभेला मराठवाड्यातून सर्वात जास्त जागा जिंकून द्या. पन्नास खोके एकदम ओके, हे विसरु नका, महायुतीचे सरकार भ्रष्टाचारातून बनलेले सरकार आहे. बहिण लाडकी नाही तर महायुतीला सत्ता लाडकी आहे आणि ती मिळवण्यासाठी ही धडपड सुरु आहे. आपल्याला आता शेतकरी, कामगारांचे, महागाई, बरोजगारी कमी करणारे सरकार आणायचे आहे. भाजपाचा अजेंडा मात्र चातुर्वर्ण्य व्यवस्था व मनुवाद आणण्याचा आहे हे ओळखा व महाविकास आघाडीचे सरकार आणा, असे आवाहन थोरात यांनी केले.
