राहुल गांधी, पवार, ठाकरे मुंबईत एकाच व्यासपीठावर!
मुंबई दि. ५ ऑगस्ट;
दिवंगत पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांचा जन्म मुंबईतील असून २० ऑगस्ट रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतच भव्य कार्यक्रम केला जाणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह देशभरातील पक्षाचे वरिष्ठ नेते या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे.
हॉटेल लिला येथे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर रमेश चेन्नीथला प्रसार माध्यमांशी बोलत होते, ते पुढे म्हणाले की, आजच्या बैठकीत जागा वाटपाबद्द्ल चर्चा झालेली नाही, त्यासंदर्भात ७ तारखेच्या बैठकीत चर्चा होईल. कोणी किती जागा लढवणार यावर अद्याप चर्चा झालेली नाही. मविआ सक्षम आहे आणि सर्वजण मिळून महाराष्ट्रात मविआचे सरकार आणण्यासाठी एकजुट होऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. लोकसभा निवडणुकीत मविआला जनतेने चांगला प्रतिसाद दिला आहे. विधानसभेलाही असाच प्रतिसाद मिळेल असा विश्वास चेन्नीथला यांनी व्यक्त केला.
