अंकुश सुरवडे प्रकरणी BMC कडून चौकशी समिती..

0
IMG-20200916-WA0058

मुंबई दि. १६ सप्टेंबर:

२६ वर्षाच्या अंकुश सुरवडे या तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहाची अदलाबदल झाल्याप्रकरणात सायन रुग्णालय प्रशासनाचा निष्काळजीपणा झाल्याची स्पष्ट कबुली मुंबई महापलिका आयुक्तांनी दिली. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी मान्य करण्यात आली असून यासाठी चौकशी समिती नेमण्याचे आश्वासन पालिका आयुक्तांनी दिल्याची माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली.
अंकुश सुरवडे या तरुणाचा २८ ऑगस्ट ला पूर्व द्रुतगती मार्गावर अपघात झाल्यानंतर त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण १४ सप्टेंबरला अंकुशचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयातून कळल्यानंतर अंकुशचे नातेवाईक व मित्रपरिवार रुग्णालयात गेले. पण त्यांच्या असे लक्षात आले की, अंकुशच्या किडनीजवळ शस्त्रक्रिया करुन टाके घालण्यात आले आहेत. याबाबत नातेवाईकांनी डॉक्टरांकडे विचारणा केल्यानंतर डॉक्टरांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. रुग्णालयाकडून कोणताही समाधानकारक खुलासा करण्यात आला नाही. दरम्यान अंकुशचा मृतदेह शवागारात पाठविण्यात आला. दोन तासानंतर नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गेले असता अंकुशचा मृतदेह चुकुन दुस-याला देण्यात आला व त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. सायन रुग्णालयाच्या या संशयास्पद काराभाराविरुध्द विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सायन रुग्णालयाच्या काल बाहेर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाप्रसंगी पालिका आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनामुळे आज प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्त चहल यांची पालिका मुख्यालयात भेट घेतली.

प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, अंकुश या युवकाच्या डोक्याला मार लागला असताना त्याचे ऑपरेशन का केले, याचे स्पष्टीकरण पालिका आयुक्तांनी दिले पण रुग्णालयातील त्या विभागात किडनीचा गैरव्यवहार होतो त्यामुळे कुटुंबियांचा संशय आहे की यामध्ये काही वेगळे घडले असावे यासाठी आम्ही या प्रकरणाची चौकशी करण्याची अशी मागणी केली.

सायन रुग्णालयामध्ये मृतदेहा संदर्भात, रुग्णाच्या प्रवेशा संदर्भात, मशिनरी उपलब्ध नसणे, एमआरआय नादुरुस्त अवस्थेत असणे, असे प्रकार गेल्या काहि महिन्यांपासून वारंवार घडत आहेत. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून येणा-या रुग्णांसाठी व मुंबईमधील सामान्या रुग्णांसाठी हे एक प्रमुख रुग्णालय आहे असे सांगताना दरेकर म्हणाले की, अंकुश सुरवडे प्रकरणात सायन रुग्णालयाकडून निष्काळजीपणा व हलगर्जीपणा झाल्याचे पालिका आयुक्तांनी मान्य केले. त्यामुळे या प्रकरणात केवळ कनिष्ठ दर्जाच्या अधिका-यांना निलंबित करुन चालणार नाही तर जबाबदार अधिका-यांवर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी होती. त्यामुळे सुरवडे प्रकरणात एक चौकशी समिती नेमण्याची मागणी पालिका आयुक्तांनी मान्य केली आहे. या समितीमध्ये आरोग्य खात्यातील तज्ञ व पोलिस खात्यातील अधिकारी यांचा समावेश असेल असे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. पण या समितीमध्ये सर्वपक्षीय नगरसेवक असावा अशी विनंतीही आम्ही यावेळी आयुक्तांकडे केल्याची माहिती दरेकर यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *