FB_IMG_1721630284951

पुणे, दि २२ जुलै ;

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे शिरोमणी आहेत. या देशात भ्रष्टाचाराला संस्थात्मक प्रतिष्ठा देण्याचे काम शरद पवार यांनी केले पण आता शरद पवारांचा खोटेपणा चालणार नाही, असा इशारा देत घरोघरी जाऊन पवारांच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश केला जाईल, संभ्रम पसरविण्याचे सारे प्रयत्न हाणून पाडले जातील असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.

अमित शाह पुढे म्हणाले की, शरद पवार यांच्याकडे हिंमत असेल तर केंद्रातील युपीए सरकारमध्ये मंत्री असताना महाराष्ट्राकरिता काय केले, याचा हिशेब देण्यासाठी त्यांनी पुण्याच्या कोणत्याही चौकात चर्चेसाठी यावे, मुरलीधर मोहोळ त्याचा संपूर्ण हिशेब जनतेसमोर मांडतील. महाराष्ट्राकरिता मोदी सरकारने केलेल्या विकास कामांची संपूर्ण यादीच शाह यांनी कार्यकर्त्यांसमोर मांडली. पवार यांनी कृषीमंत्री असूनही दहा वर्षांत साखर कारखान्यांच्या इन्कम टॅक्सचा प्रश्नदेखील सोडविला नाही, तो मोदी यांनी चुटकीसरशी सोडविला, असे ते म्हणाले.

देशाने राहुल गांधींच्या खटाखट आश्वासनावर विश्वास ठेवला नाहीच, पण ज्या राज्यांत त्यांची सरकारे आहेत, तेथे तरी त्यांनी खटाखट पैसे द्यावेत, असे आव्हानही त्यांनी दिले. तेलंगणा, कर्नाटक हिमाचलातील एक तृतीयांश आश्वासनेही त्यांनी पूर्ण केलेली नाहीत. मोदी सरकारने आपले प्रत्येक आश्वासन पूर्ण केले. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यात विकासाचे महामार्ग उभे केले. अनेक महत्वाकांक्षी योजना पूर्ण केल्या. 2014 ते 2019 हा फडणवीस यांचा सत्तेचा कार्यकाळ महाराष्ट्राच्या इतिहासात अभिमानाने नोंदला जाईल, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेणाऱ्या काँग्रेसने त्यांचा जेवढा अपमान केला,तेवढा ब्रिटिशांनीही केला नव्हता. भाजपा सरकारने बाबासाहेबांचा सन्मान केला. मोदी सरकारने देशाची सुरक्षा सुनिश्चित केली, नक्षलवादाची पाळेमुळे खणून दोन वर्षांत हा देश नक्षलमुक्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. औरंगजेब फॅन क्लबकडून देश सुरक्षित राहणार नाही. कसाबला बिर्याणी खाऊ घालणाऱ्यांच्या मांडीवर बसून स्वतःस बाळासाहेबांचा वारस म्हणविणारे उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे यांचीही खिल्ली उडवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *