विधान परिषद निवडणुकीत रणनिती चुकली.
पुणे, दि.१७ जुलै:
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसकडे अधिकचे मतं होती. आमच्याकडे बारा मतं होती. उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे आमच्यापेक्षा जास्त मतं होती. काँग्रेसने पहिले मतं त्यांच्या उमेदवाराला देणं साहजिकच आहे. पण, उरलेली पहिली आणि दुसऱ्या पसंतीक्रमाची मतं योग्यपणे दिली असती तर तिन्ही उमेदवार निवडून आले असते पण, आमची रणनीती चुकली, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
जयंत पाटील यांच्याबाबत महाविकास आघाडी मधील तिन्ही पक्षांमध्ये निर्णय झालेला नव्हता. माझ्याकडे १२ मतं होती. शेकापच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा असं आम्हाला वाटत होतं. कारण, लोकसभा आम्ही डाव्या पक्षांसोबत लढवली होती. त्यांनी काही जागा मागितल्या होत्या, पण ते आम्ही देण्याच्या स्थितीत नव्हतो. त्यामुळे जयंत पाटील यांना आम्ही पाठिंबा देण्याचं ठरवलं होतं, असेही शरद पवार साहेब यांनी सांगितले.
छगन भुजबळांच्या भेटीवर बोलताना पवार म्हणाले, मला ताप होता. मात्र, भुजबळांनी भेटायचा आग्रह धरला. महाराष्ट्राच्या हिताच्या काही गोष्टी आहेत असे ते म्हणाले. जरांगेंशी मुख्यमंत्री शिंदेसोबत काय चर्चा केली हे आम्हाला माहीत नाही. सरकारने जरांगेंना काय आश्वासन दिले, ओबीसी आंदोलकांना काय आश्वासन दिले याचे वास्तव समोर येत नाही तो पर्यंत बैठकीला जायचे नाही, अशी आमची भूमिका होती. शिंदेंनी मनोज जरांगे आणि हाके यांच्याशी चर्चा काय केली हे मला माहीत नाही. सरकारने आरक्षणावर सामंजस्याची भूमिका घ्यावी असे शरद पवार म्हणाले.
सरकारने मनोज जरांगे पाटील यांना काय आश्वासन दिलं हे मला माहिती नाही. मात्र, आज राज्यात शांततेची गरज आहे याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. ती शांतता निर्माण व्हायलाचं पाहिजे या मताचा मी आहे. तसंच, जरांगे यांच्यासोबत जर सरकारने संवाद साधला असेल तर त्यामध्ये विरोधकांचं काय काम असा प्रतिप्रश्न उपस्थित केला. तसेच अगोदर विरोधकांना बाजूला ठेवलं आणि आता विचारतायेत असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला आहे.
अरे ती बारामती आहे. लोकांशी वैयक्तीक संबंध ठेवले पाहिजे. याआधी मी फक्त शेवटची सभा घ्यायचो. मी ५० टक्के लोकांना नावाने ओळखायचो. पण आता जुनी लोकं नाहीत. मला खात्री होती की लोक सुप्रियाला निवडून देतील. घरात सगळ्यांना जागा आहे. पक्षात जागा आहे की नाही हा व्यतिगत निर्णय मी घेणार नाही. माझे सगळे सहकारी या संघर्षाच्या काळामध्ये मजबुतीनं उभे राहिले त्यांना पहिल्यांदा विचारेल आणि ते तयार झाले तर मग काय असेल तो निर्णय घेईन असेही शरद पवार म्हणाले.
