20200902_184114

मुंबई, दि. १३ सप्टेंबर :

“राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी जनतेशी साधलेला संवाद हा महाराष्ट्रातील संकटकाळात जनतेचा भ्रमनिरास करणारा होता. कोरोना रुग्ण, मृत्यूंची संख्या सतत वाढत असताना, ऑक्सिजनच्या तुडवड्याची मोठ्याप्रमाणावर बोंब होत असताना, राज्य सरकार काय उपाययोजना करतेय, किंवा करणार आहे ? याचा लेखा जोखा आला नाही, अशी स्पष्ट भूमिका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मांडली. मुख्यमंत्रांच्या निवेदनावर भाष्य करताना निसर्ग वादळ, कोरोना, महापूर, मराठा आरक्षणावर सरकाराने पुढील काहीच उपाययोजना जाहीर केल्या नसल्याची जोरदार टीकाही त्यांनी केली आहे.

निसर्ग वादळात कोकणाला मदत जाहीर केली परंतु पडलेल्या घरांना, झाडांना आजही मदत मिळालेली नाही, तो कोंकणवासीयांचा आक्रोश सुरु आहे, त्यावर काही भाष्य नाही. कोल्हापूर, सांगली, साताऱ्याला महापूर आला, त्यानंतर चंद्रपूर विदर्भात महापूर आला त्यावर तातडीची उपाययोजना काय केली काय करणार आहात त्यावर भाष्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

निवृत्त नौदल अधिकाऱ्याला शैवसैनिकांनी मारहाण केल्यामुळे महाराष्ट्राची देशभर बदनामी झाली. त्यावर दिलगिरी व्यक्त करायची सोडून साधं भाष्यही त्यावर केलेले नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, उद्योगधंदे बंद आहेत, पोटाची खळगी कशी भरायची याच्या विवंचनेत बारा बलुतेदार आहेत, त्यावर काही मदतीचा दिलासा नाही, अशी टीकाही प्रवीण दरेकर यांनी केली.

महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या विषयावर थातुर माथुर व्यक्तव्य केले. आपली बाजू अपवादात्मक परिस्थिती कशी आहे हे कोर्टामध्ये मांडण्यात अपयश आल्याचे ऑर्डरमधून स्पष्ट दिसते. आपले भविष्य अंधारात आल्यानंतर, मराठा तरुण रस्त्यावर उतरल्यावर, विष पिऊन आत्महत्या करीत आहेत. ते सावरण्याची उपाययोजना देण्याऐवजी, त्यांना आंदोलन करू नका म्हणून सांगता. त्यांचे जीवन उध्वस्त झाले असताना, उद्धवजी ठाकरे साहेबांचे वक्त्यव्य म्हणजे केवळ बोलाचीच कढी व बोलाचाच भात असल्याचे दिसते आहे, असे सांगितले.

राजकारण करू नका म्हणून बोलायचे आणि स्वतःच राजकारण करायचे. वर राजकीय वादळे समर्थपणे थोपवू म्हणून सांगितले. पण समर्थपणे वादळांना थोपविण्यापेक्षा ती समर्थता आज कोरोना थोपविण्यासाठी आवश्यक आहे. त्यामध्ये सरकार असमर्थ ठरले आहे. आता कोणत्या शब्दात विनंती, मागण्या कराव्यात हे मला कळत नाही. सरकारने आता तरी जागे होऊन कोरोनाबाबत राज्यात जो जो आक्रोश होत आहे, तो दूर करण्यासाठी सरकारने अत्यन्त प्रामाणिकपणे आणि पोडतिडकीने काम करावे. जलदगतीने उपाययोजना कराव्यात, अशी माझी हात जोडून नम्र विंनती या राज्य सरकारला आहे,” अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *