काँग्रेस आमदार पी. एन. पाटील यांचे निधन..

0
IMG-20240523-WA0032

मुंबई, दि. 23 मे ;

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस पक्षाचे आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक व वेदनादायी आहे. ते काँग्रेस विचारांचे सच्चे पाईक होते. ते आयुष्यभर काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ राहिले त्यांच्या निधनाने एक सच्चा काँग्रेसी व धडाडीचा लोकसेवक हरपला आहे.

आ. पी. एन. पाटील यांचा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क होता. मनमिळाऊ व सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा त्यांचा स्वभाव होता. पण प्रसंगी प्रचंड आक्रमक होऊन ते लोकांचे प्रश्न सोडवत होते. गेली चार दशके कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारण आणि सहकार क्षेत्रात ते सक्रिय होते. कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून तब्बल २२ वर्ष जबाबदारी सांभाळून त्यांनी पक्ष संघटना वाढवण्याचे काम केले. गोकुळ दुध संघाचे संचालक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांनी शेतक-यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. 2004 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय संपादन केला व ते विधानसभेत पोहोचले. त्यांनी करवीर आणि कोल्हापूरच्या जनतेचे प्रश्न अत्यंत पोटतिडकीने मांडून ते सोडवण्याचा प्रयत्न केला. आपल्या जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या अडचणीच्या वेळी धावून येणारा नेता म्हणून ते परिचित होते. त्यांनी समाजकारणासोबतच कृषी, सहकार व शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने कोल्हापूरच्या सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

दिवंगत पी.एन. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून काँग्रेस पक्ष पाटील कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे असे प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *