…त्यानंतर देशात हुकूमशाहीला सुरुवात होईल
भिवंडी दि. १७ मे :
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले त्या संविधानाने आपल्या सर्वांना काही अधिकार दिले आहे. भारतीय जनता पार्टीचे नेत्यांकडून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा भाषणादरम्यान 400 पारचा नारा देत आहेत, त्यांना संविधान बदलण्यासाठी ४०० च्या वरती जागा पाहिजे आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या मार्फत आपल्याला अधिकार दिला आहे. तो अधिकार संविधान बदलण्याच्या नंतर या सरकारकडून काढून घेण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यानंतर देशात लोकशाही नाहीतर हुकूमशाहीला सुरुवात होईल, असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.
महाविकास आघाडीचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश उर्फ (बाळ्यामामा ) म्हात्रे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शरद पवार बोलत होते.
शरद पवार म्हणाले की, देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असणार आहे ज्या लोकांच्या हातात सत्ता आहे ते पुन्हा निवडून आले तर संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार संकटात येईल. लोकशाही म्हणजे कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार घटनेने तुम्हाला दिला, आणि तो निर्णय तुम्ही मतपेटीद्वारे घ्यावा, याचा अर्थ संसदीय लोकशाही. आज त्याची चिंता सबंध देशात आहे.
कांद्याचा प्रश्नावर बोलायलाच नको. गुजरातच्या कांद्याला निर्यात करायला परवानगी मग महाराष्ट्राला का नाही, असा प्रश्न उपस्थित करत शेतकर्यांना आधार देण्याची जबाबदारी सरकारची असते. काॅंग्रेस सरकारच्या काळात कांद्याचे भाव वाढले होते. तेव्हा भाजप विरोधी पक्ष होता. त्यावेळी मी कृषीमंत्री होतो. भाजप कांद्याच्या माळा गळ्यात घालून संसदेत आंदोलन करत होते. माझ्याविरोधात घोषणाबाजी करत होते. पण मी कांद्यामुळे शेतकर्यांना दोन पैसे मिळत असतील, त्याचा भाव खाली येईल, असा कोणताही निर्णय घेण्यास ठाम नकार दिला. सगळ्याच शेतीमध्ये समस्या निर्माण करून ठेवली आहे. याशिवाय बेरोजगारीचा प्रश्न तीव्र झाला आहे. असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.
यावेळी व्यासपीठावर आप पक्षाचे अध्यक्ष दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे , प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड,यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते कार्यकर्ते उपस्थित होते.
