उद्धव ठाकरेंची हिंदुत्वाशी बेईमानी..
पालघर, दि १७ मे –
जनादेशाचा अवमान करून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना उद्धव ठाकरेंनी बगल दिली. हिंदुत्वाशी बेईमानी केली. एकेकाळी बाळासाहेबांच्या विचारांची धगधगती मशाल देशाने अनुभवली आहे. पण बाळासाहेबांच्या विचारांशी फारकत घेतलेली ‘मशाल’ ज्यावेळी पंज्याचा प्रचार करायला लागली त्याचवेळी जनतेचा त्यांच्यावरील विश्वास पूर्णपणे उडाला. आता भारतीयांचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या विकासाच्या दृष्टीवर आहे, या शब्दांत राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
सातपाटी जिल्हा पालघर येथे महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत विष्णू सावरा यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेला संबोधित करीत होते.
सुधीर मनगंटीवार यांनी शिंदे फडणवीस सरकारच्या कार्यकाळात मच्छीमार बांधवांसाठी झालेल्या विविध विकास व कल्याणकारी योजनांचा आढावा घेत महाविकास आघाडीच्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अनेक पक्षांची मोट बांधून तयार झालेल्या इंडीया आघाडी कडे पंतप्रधानपदाचा उमेदवारच नाही.केवळ निवडणूकीपुरते मतदारांसमोर जाऊन मायावी पद्धतीने भुरळ घालण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचे नेते करताहेत.
सर्वाधिक काळ सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाला विकासाच्या बाबतीत भाजपला प्रश्न विचारण्याचा मुळात अधिकारच नसून मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात केलेल्या पायाभूत व मूलभूत सुविधांच्या विकासाचा झंझावात देशाच्या जनतेने अनुभवला आहे. स्वतःच्या मूळ विचारांना बगल देत, काँग्रेससाठी प्रचार करणाऱ्या उद्धव ठाकरे यांची अवस्था केविलवाणी आहे; त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरुद्ध उचललेला धनुष्यबाण त्यांना पराभूत करणार आहे. महागाईच्या नावावर जनतेला भ्रमित करणाऱ्या काँग्रेस पक्षाने कायम तळागळातील माणसांची उपेक्षा केली आहे.
श्रीनगरच्या लाल चौकात विमानाने तिरंगा फडकवण्याची हिंमत मोदी सरकारमुळे सर्वसामान्य भारतीयांमध्ये आली आहे. या देशाचा गौरव वाढविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून, ही लढाई विकास विरुद्ध विनाश प्रगती विरुद्ध अधोगती अशा पद्धतीने सुरू असून मतदारांनी देशाच्या प्रगतीसाठी नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपा व महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन देखील मुनगंटीवार यांनी केले.
