IMG-20240513-WA0072

कल्याण, दि. १६ मे:
पराभवाच्या भितीने इंडिया आघाडी बिथरलेली आहे. त्यांच्या नादी लागून उद्धव ठाकरेंनी पाकिस्तानची हुजरेगिरी सुरु केली आहे. मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी इक्बाल मुसा याला ठाकरेंनी प्रचारात उतरवले. त्यांच्या प्रचार मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे फडकले जातात. कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळल्यावर लाज तरी कशी वाटणार, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावला.

कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदार संघात आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेले सुराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान कऱण्यासाठी आणि त्यांना मत देणारी जनता आम्ही काल वाराणसीमध्ये पाहिली. मोदीजींचा उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित राहण्याची संधी मिळाली, हे आमचे भाग्य आहे. नरेंद्र मोदी जनतेच्या ह्रदयातील प्रधानमंत्री आहेत, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करोडे देशवासियांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्यासारखा प्रधानमंत्री यापूर्वी झाला नाही आणि होणार नाही. जेव्हा मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटतो तेव्हा हरिवंशराय बच्चन यांची कविता आठवते. तू न थकेगा कभी, तू न रुकेगा कभी, तू न मुडेगा कभी, कर शपथ अग्निपथ! अग्निपथ! अग्निपथ! नरेंद्र मोदी यांची राजकीय कारकिर्द अग्निपथाप्रमाणे राहिली आहे, असा गौरव मुख्यमंत्र्यांनी केला.

२०१४ पूर्वी देशाचे पंतप्रधान एकदाही कल्याणमध्ये आले नाहीत. मात्र २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा कल्याणमध्ये आले. नरेंद्र मोदी यांच्या पदस्पर्शामुळे भिवंडी, कल्याण आणि ठाणे या जागा महायुतीने जिंकल्यात जमा आहे, असे वातावरण तयार झाले आहे. मोदी यांच्या आशिर्वादाने कपिल पाटील आणि डॉ. श्रीकांत शिंदे विजयाची हॅट्ट्रिक करतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

ही निवडणूक देशाची आहे, विकासाची ही निवडणूक आहे. देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारी ही निवडणूक आहे. देशात फक्त मोदी मोदी हा गजर सुरु आहे. पण विरोधक मोदीजींच्या नावे टीका करत आहेत. मात्र देश बघतोय एक अकेला मोदी किती लोकांना भारी पडत आहे. मोदींनी ३७० कलम हटवले, राम मंदीर बांधले. देशाला महासत्ता करणार ही मोदी गॅरंटी आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

तरुणांच्या हाताला काम देणारे, उद्योगांना संजिवनी देणारे नरेंद्र मोदी, महिलांना आत्मसन्मान मिळवून देणारे, लहान मुलांमध्ये लहान होऊन रमणारे नरेंद्र आणि सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानला धडा शिकवणारे नरेंद्र मोदी ही त्यांची ओळख आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *