घाटकोपरमध्ये होर्डिग कोसळून 14 ठार.
मुंबई, १४ मे :-
घाटकोपर भागात पूर्व द्रुतगती महामार्गालगत असलेले एक मोठे होर्डिंग कोसळून 14 जण ठार झाले असून 75-80 लोक जखमी झाले आहेत. जखमींवर राजावाडी हाॅस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत. या दुर्घटनेनंतर अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न चर्चेत आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना, झालेली दुर्घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. मुंबईतील अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून अशी होर्डिंग्ज तात्काळ काढून टाकण्याचे निर्देश पालिका आयुक्तांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या दुर्घटनास्थळी वेगाने बचावकार्य सुरू करण्यात आले असून हायड्रा आणि क्रेनच्या मदतीने हे होर्डिंग हटविण्याचे काम सूरु आहे. आतापर्यंत 57 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून शासनाच्या वतीने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत दिली जाईल असे शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच या दुर्घटनेतील जखमींवर सरकारी खर्चाने उपचार करण्यात येतील तसेच आशा घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असेही शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
