गांधी नेहरु विचारधारा सोडून कुठेही जाणार नाही.

0
images (94)

पुणे,  दि. ११ मे :

पंतप्रधान मोदींच्या विचारांविरोधात जनमत तयार होत असल्याने त्यांच्यात अस्वस्थतता निर्माण झाली आहे. त्यामुळे ते संभ्रम निर्माण करणारी विधाने करत आहेत. एखाद्या पक्षाबद्दल नकली किंवा असली म्हणण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? प्रधानमंत्र्यांनी काही गोष्टींचं तारतम्य बाळगायला हवं. नकली वा असली म्हणणं अयोग्य आणि अशोभनीय आहे. गांधी-नेहरूंची विचारधारा आम्हाला प्रिय आहे. ती सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

शरद पवार म्हणाले की, आज या देशात संसदीय लोकशाही पद्धती मोदींमुळे संकटात आली आहे. दिल्ली व झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. यात केंद्र सरकारचा सहभाग असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, की लोकशाही पद्धतीवर कोणाचा कितपत विश्वास आहे. ज्या व्यक्तीचा, धोरणाचा, पक्षाचा, विचारधारेचा संसदीय लोकशाही पद्धतीवर विश्वासच नाही, असा समज लोकांमध्ये पक्का झाला असेल.

मोदींनी मुस्लिम समाजाचा वेगळा उल्लेख केला. हा देश एकसंघ ठेवायचा असेल, इथे हिंदु, मुस्लिम, शीख, इसाई, जैन या सगळ्या घटकांना एकत्र ठेऊन आपल्याला हा देश पुढे न्यावा लागेल. त्यातील एका किंवा दोन् समाजासंबंधी काही वेगळी भूमिका आपण मांडायला लागलो, तर समाजात ऐक्य राहणार नाही, गैरविश्वास राहील. आणि मोदींची अलीकडची काही भाषणं ही समाजा-समाजात गैरविश्वास व्हायला पोषक आहेत, आणि हे देशाच्या दृष्टीने घातक आहेत. जे देशाच्या हिताचं नाही, तिथे मी किंवा माझे सहकारी असणार नाहीत.

SC, ST यांचं आरक्षण वाढवायचं असेल, तर त्याला आमचा विरोध नाही. अवश्य वाढवा. पण, एखाद्या समाजाचं आरक्षण कमी करणं, एखाद्या समाजाविषयी राज्यकर्त्यांनी अशी भूमिका घेऊन कसं चालेल? प्रधानमंत्री सगळ्यांचे असतात, देशाचे असतात, जे देशाचे नेतृत्व करतात, त्यांनी एका धर्म, जाती व भाषेचा विचार करण्याची सुरुवात केली तर या देशाचं ऐक्य संकटात येईल, मग ते प्रधानमंत्री असो किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री असो. असेही पवार म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भाषणात मुस्लीम समाजाबद्दल काहीतरी भाष्य केल्याचे आम्ही ऐकले. हा देश पुढे घेऊन जायचा असेल तर सर्वधर्मीयांना एकत्र घेऊन जावेच लागेल. एखाद्या समाजाला बाजूला ठेवून पुढे जाता येणार नाही. पंतप्रधान मोदी अलीकडे वारंवार एका धर्माच्या विरोधात भूमिका मांडत आहेत, अशी भूमिका मांडणाऱ्यांच्या बरोबर आम्ही कधीही जाणार नाही असेही शरद पवार साहेब म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *