असली विरुद्ध नकली शिवसेनेची लढाई..

0
IMG-20240501-WA0254

मुंबई, दि. ६ मे :

लोकसभेची ही निवडणूक असली आणि नकली मधली लढाई आहे. पाकिस्तानची भाषा बोलणारे आणि दहशतवाद्यांना घरात घुसून मारणाऱ्यांमधली ही लढाई आहे, अशी भूमिका या सभेला संबोधित करत असताना आमदार आशिष शेलार यांनी मांडली. ही लोकसभा निवडणूक देशासाठी महत्त्वाची असून मतदारांनी असली शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन केले.

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या प्रचाराचा नारळ शनिवारी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते वाढवण्यात आला.

ज्या काँग्रेसने मुंबईला केंद्रशासित केले, महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न केला, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये ज्या काँग्रेसने आंदोलन करणाऱ्यांवर गोळ्या झाडल्या, त्या काँग्रेसशी उद्धव ठाकरे यांनी हात मिळवणी केली आहे. त्यामुळे मराठी माणसाचे काँग्रेसच्या हाताला लागलेले रक्त उद्धव ठाकरे यांच्या हातालाही लागले आहे. म्हणून त्यांची शिवसेना नकली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसशी कधीच हात मिळवणी केली नाही. त्यांची असली शिवसेना आज आमच्या सोबत आहे असेही त्यांनी नमूद केले.

खासदार गजानन कीर्तिकर म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या सोबत संसदेत काम करण्याची मला संधी मिळाली. 370 कलम हटवले गेले, असे अनेक ऐतिहासिक निर्णय झाले, त्या ऐतिहासिक निर्णयांचा मला साक्षीदार होता आले, नरेंद्र मोदी यांनी केलेली देशातील कामे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलेली कामे तुमच्या सोबत आहेत, त्यामुळे ती फक्त लोकांपर्यंत पोहोचवा, गैरसमज दूर करा, लोकांशी संवाद साधा, आपला विजय निश्चित आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार अमित साटम माजी मंत्री विद्या ठाकूर, आमदार राजहंस सिंह, भारतीताई लवेकर यांच्यासह शिवसेना भाजपा रिपाई महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *