अतिरेक करू नका नाही तर ‘करारा जवाब मिलेगा’ !
बारामती, दि. ३ मे:
आमच्या घरातील गोष्टी रोज टीव्हीवर दिसतात, अनेक प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे आहेत पण देणार नाही. अनेक महिने झालं सहन करत आहे, आता जास्त दिवस सहन करणार नाही, उद्रेक होऊ देऊ नका. माझ्या आणि रोहितच्या आईवर दोनवेळा बोलला ठीक आहे, तिसऱ्या वेळी बोलला, तर करारा जवाब मिलेगा असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.
लोकसभा निवडणूकीच्या प्रचारार्थ बारामती येथे आयोजित महिला मेळाव्याला उपस्थित महिलांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आयुष्यात पैसा नाही तर नाती महत्वाची असतात, त्यातही नाते तोडण्यापेक्षा ते नाते जपणे जास्त अवघड असते. सुनंदा वहिनींंमध्ये मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व असे तिन्ही गुण आहेत पण काहीजण याचे भान न ठेवता टिका करतात, हे दुर्देवी आहे. माझ्या कुटुंबांवर आज टिका केली जात आहे. त्या टीकेची उत्तरे माझ्याकडे आहेत पण मी ते देणार नाही, कारण माझ्यावर नाती जपण्याचे संस्कार झालेत. मी उत्तर देत नाही म्हणून त्याचा अतिरेक करु नका, नाही तर सहनशीलतेलाही मर्यादा असते, त्यामुळे परत टीका कराल तर ‘करारा जवाब’ मिळेल असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
काश्मीर ते कन्याकुमारी पक्ष आहे त्यांना एक उमेदवार मिळत नाही. आमच्या घरात उमेदवारी दिली. आमचं घर फोडत निर्णय घेतला. बदल तिकडे हाजी करून होणार नाही. मी तुमच्यासाठी लढणार आहे. आमच्या खानदानाचे वाभाडे निघतील ते मी होऊ देणार नाही. बारामती म्हणजे शरद पवार असून दुसऱ्यांनी गैरसमज करू नये हे सगळं आमच्यामुळे आहे. विकास सगळ्यांच्या मदतीने होत असतो, कामे फक्त सत्तेतून होतात असे सांगितले जाते, १० वर्ष विरोधात खासदार आहे अनेक प्रकल्पात देशात बारामतीचा पहिला नंबर लागतो. वाराणसीपेक्षा बारामती सगळ्यात पुढं आहे.
लोकं म्हणतात एका विचाराचा खासदार पाहिजे. केंद्रात काँग्रेस सरकार होतं तरी गुजरातमध्ये गुजरात शायनिंग झालं की नाही? विरोधात असले तरी कामे करता येतात. लोकांशी चांगले वागलं की कामे होतात. विरोधी पक्षात आल्यापासून जास्त टाळ्या मिळतात. माझा बाप थकला नाही श्रमलेला आहे. शरद पवार कृषी मंत्री असते तर कांद्याला, दुधाला दर मिळाला असता. शेतकऱ्याचे कर्जमाफ झाले असते. २०१४ मध्ये आमची आई म्हणायची तुमचे सरकार येत नाही आणि खरंच सरकार नाही आलं. आमच्या आईची आता कटकट वाढली आहे. आता ती म्हणते आता सरकार जाईल, महागाई वाढली आहे. आपण बुथवर सिलेंडर ठेवू, आपण नमस्कार करून जाऊ. हे म्हणतात विकासासाठी मत द्या, अरे कुणाचा विकास झाला? विकास तर यांचा झाला. असेही सुप्रिया सुळे यांनी बोलताना म्हटले आहे.
महिलांमध्ये माहेर आणि सासर अशी दोन्हींची जबाबदारी घेण्याची ताकत असते. त्यामुळे मी त्यांची टीका आणि आरोपांना जास्त महत्व देत नाही, कारण माझ्यासाठी देश प्रथम, नंतर राज्य, त्यानंतर पक्ष आणि शेवटी कुटुंब आहे. बारामती म्हणजे शरद पवार आणि शरद पवार म्हणजे बारामती हे त्रिवार सत्य आहे. पवारांनी शून्यातून स्वतःचे अस्तित्व निर्माण केले, याची आठवण करुन दिली. त्याचबरोबर मी कधीही विकासकामाचे श्रेय एकटी घेत नाही, कारण विकास हा एकत्र मिळून केला जातो, एकट्याने होत नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
देशासमोर आज महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार या समस्या आहेत. महागाईची झळ काय असते, याची महिलांना खरी जाणीव असते. त्यामुळे महागाई कमी करण्यासाठी, भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि तरूणांचा हाताला रोजगार देण्यासाठी आगामी निवडणूकीत तीन नंबरवरील ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हासमोरील बटण दाबून विजयी करा, असेही सुप्रिया सुळे यांनी केले.
विशेष म्हणजे मी विरोधी पक्षाची खासदार आहे तरीही केंद्र सरकारच्या अनेक योजना राबविण्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ पहिला आला आहे. त्यामुळे सत्तेत असल्यावरच विकास होतो, असे म्हणतात, ते चुकीचे असल्याचे सांगितले. आणि डॉ . मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार सत्तेत असताना जर गुजरातचा विकास होऊ शकतो, तर मग आत्ताच केंद्र आणि राज्यात एका विचाराचे सरकार असेल तरच विकास होऊ शकतो, असा शोध कोणी लावला, कारण कामे करून घेण्याचीही एक पद्धत असते असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
