मोदींनी १० वर्षात शेतीसाठी काय केले?
वाई, दि. ३० एप्रिल ;
सध्या देशातील शेतकरी मोठा संकटात आहे मात्र केंद्र सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही. १० वर्षापूर्वी मी कृषी खाते सोडलं आणि मोदींचे राज्य आले. या दहा वर्षात त्यांनी शेतीसाठी काय केलं? असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
सातारा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचार सभेत शरद पवार बोलत होते. शरद पवार म्हणाले की, आज देशातील शेती संकटात आली, अनेक प्रश्न निर्माण झालेत. दिल्लीत प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर देशभरातील शेतकऱ्यांनी शेतमालाला किंमती नीट मिळाव्यात यासाठी आंदोलन करायचं ठरवलं. याठिकाणी लोक हजारोंच्या संख्येने आले. यात केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांशी विचारविनिमय करेल अशी अपेक्षा होती. पण त्यांनी ढुंकून बघितलं नाही. पण पंजाबचा शेतकरी हा बहाद्दर होता. ही मंडळी संपूर्ण एक वर्ष याठिकाणी होती. शेवटी सरकारला नाईलाजाने हे धोरण मान्य करावे लागले. सरकारने शब्द दिला, निर्णय घेतले पण त्या निर्णयाची शंभर टक्के अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे अनेक संकट वाढत आहेत.
इंग्रजांच्या काळात सातारकर घाबरले नाहीत. मात्र,किरकोळ लोकांच्या समोर सुद्धा घाबरणार नाहीत. आपण यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचे पाईक आहोत. छत्रपतींच काय बोलायचं? कॉलर उडवायचं म्हणजे आधी सकाळ आहे का? संध्याकाळ आहे? हे बघावं लागतं. त्यांच्या विषयी जास्त बोलण्याचे कारण नाही. आम्ही गादीचा सन्मान करतो पण मत देताना मत गादीला देत नाही.
शशिकांत शिंदे हे कष्ठकरी कुटूंबातले आहेत. आज त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. तुमच्या पाठिंब्यावर ते यशस्वी होतील. हे भ्रष्टाचार घालवू म्हणतात मात्र भ्रष्टाचार घालवायचा ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्यावर कारवाई केली गेली. सत्तेचा गैरवापर कसा करतात याची उदाहरणं त्यांनी दिली. त्यांना धडा शिकवण्याची ताकत सातारकरांमध्ये आहे.
गुजरातमध्ये मोदी मुख्यमंत्री असताना एका भगिनीच्या घरात हल्ला झाला. अत्याचार केले गेले,त्यांच्या सास-यांची हत्या करण्यात आली. यात ११ वर्षांची शिक्षा झाली. मात्र, मोदी सत्तेवर आल्यानंतर त्यांची सुटका केली आणि गळ्यात हार घालून सन्मान केला. स्त्रीयांची अब्रू घेणा-यांचा सन्मान करण्याचं धोरण जे स्विकारतात ते देशाचे हितचिंतक असू शकत नाही. त्यांना मत मागण्याचा अधिकार नाही असे शरद पवार म्हणाले.
