महायुतीला मोदींचे जगातील पॉवरफुल इंजिन..
पेण, दि. २६ एप्रिल –
आपल्या महायुतीला मोदींचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन आहे. या इंजिनाला आपल्या वेगवेगळ्या अनेक घटकपक्षांचे डब्बे लागले आहेत. अशा डब्यांमध्ये दीनदलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, भटके विमुक्त, सगळ्यांना बसण्याची जागा आहे. ही विकासाची गाडी आहे. त्या गाडीमध्ये सगळ्यांना बसवून ‘सबका साथ… सबका विकास’… करत ही गाडी पुढे जात आहे असे उद्गार भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेण येथील विराट सभेत काढले.
ही निवडणूक ग्रामपंचायतींची…जिल्हा परिषदेची…ही निवडणूक नगर पंचायतीची…महानगरपालिकेची… विधानसभेची नाही… तर लोकसभेची आहे…देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे… कोणाच्या हातात देश सुरक्षित राहिल… कोण देशाला विकासाकडे नेऊ शकेल… कोण आमच्या येत्या पिढ्यांचे भाग्य आणि भवितव्य बदलू शकेल याचा फैसला करणारी निवडणूक आहे… आणि या निवडणुकीत केवळ दोनच पर्याय आपल्यासमोर दिसत आहेत… पहिला पर्याय आहे विश्वगौरव… विकासपुरुष नरेंद्र मोदी आणि मोदींजींच्या नेतृत्वामध्ये आपली महायुती एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजितदादांची राष्ट्रवादी असेल आता मनसेही सोबत आहे. रिपाईसुध्दा आहे, अशी भव्य महायुती आहे आणि दुसरीकडे राहुल गांधी यांच्या नेतृत्वात २६ पक्षांची खिचडी आहे. असे दोन पर्याय आपल्यासमोर आहेत असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दुसरीकडे काय अवस्था आहे. तिथे डब्बेच नाहीत. प्रत्येकजण सांगतोय मीच इंजिन आहे. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन… शरद पवार म्हणतात मी इंजिन उध्दव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे… मात्र आपल्याकडे बसायला ट्रेन आहे आणि बसायला जागाही आहे. परंतु इंजिनमध्ये किती लोकांना बसायला जागा असते. इंजिनमध्ये केवळ ड्रायव्हर बसू शकतो. सामान्य माणूस इंजिनमध्ये बसू शकत नाही आणि त्यांचे इंजिन कसे आहे. राहुल गांधी यांच्या इंजिनमध्ये फक्त सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांना जागा आहे तर शरद पवारांच्या इंजिनमध्ये सुप्रिया सुळेच बसू शकतात आणि उध्दव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये आदित्य ठाकरेच बसू शकतात. इतर कुणालाही त्यांच्या इंजिनमध्ये बसायची जागा नाही… यांचे इंजिन कसे आहे तर राहुल गांधी दिल्लीकडे ओढतात… शरद पवार बारामतीकडे ओढतात आणि उध्दव ठाकरे मुंबईकडे ओढतात… त्यामुळे यांचे इंजिन जागेवरून हालतही नाही डुलतही नाही फक्त ठप्प पडलेले आहे. त्यामुळे एकच पर्याय आहे तो म्हणजे नरेंद्र मोदींचा… ज्यांनी या देशाला विकासाकडे नेले आहे असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
या देशात मोदींनी काय किमया केलीय तर दहा वर्षांत देशातील २५ कोटी लोकं हे गरीबी रेषेच्यावर आले. दहा वर्षात २० कोटी लोकं जे झोपडीत रहायचे त्यांना पक्के घर मिळाले. देशामध्ये ५० कोटी घरांमध्ये मोदींनी गॅस पोहोचवला. ५५ कोटी लोकांना शौचालयाची व्यवस्था केली. ६० कोटी लोकांच्या घरी पिण्याचे शुद्ध पाणी पोहोचवले. ५५ कोटी लोकांना ५ लाखांपर्यंत उपचार आयुष्यमान भारत माध्यमातून मोफत दिला. ६० कोटी तरुणांना मुद्राचे दहा लाखापर्यंत कर्ज विनातारण दिले. यात ३१ कोटी महिला आहेत की ज्या आज आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. ८० लाख बचत गटांना ८ लाख कोटी रुपये दिले आणि महिलांना स्वतः च्या पायावर उभे केले. मोदी म्हणतात एक पुरुष पायावर उभा राहिला तर केवळ पुरुष उभा रहातो पण महिला पायावर उभ्या राहिल्या तर संपूर्ण कुटुंब पायावर उभे राहते. आता बचतगटांच्या महिलांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, सरकारी जागा परिसरात विक्री केंद्र उभी करायला सांगितले आहे आणि आता २०२६ नंतर विधानसभेतही आणि लोकसभेतही महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे महिलांना अधिकार देण्याचे काम मोदींनी केले आहे असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांसाठी आणण्यात आल्या आहेत. सगळे प्रश्न सोडवत आहोत काळजी करू नका. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला जाणार आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान पुन्हा झाले तर अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणली जाणार आहे. देशात आणि राज्यात रस्त्यांचे जाळे निर्माण होत आहेत. मोदींनी या देशातील भ्रष्टाचार संपवला आणि जनतेचा पैसा जनतेपर्यंत पोहोचवला आहे. कोरोना काळात या देशातील जनतेला लस तयार करून जिवंत ठेवण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला.
अनंत गीते आमची मते घेऊन निवडून येत होते त्यावेळी त्यांना गुदगुल्या होत होत्या आणि आज आमच्यावर टिका करत आहेत. पण लक्षात ठेवा अनंत गीते याठिकाणी खरी शिवसेना आमच्यासोबत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारे एकनाथ शिंदे आमच्यासोबत आहेत. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडला त्यांच्यासोबत जनता कधीही जाणार नाही असेही देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.
