दादांनी घेतली ‘जम्बो’ कारभाराची झाडाझडती!

0
IMG-20200911-WA0012

पुणे, दि. ११ सप्टेंबर:
पुण्यातील जम्बो हाॅस्पिटल्सच्या गैरकारभारावर चौफेर टीका झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अधिका-यांची झाडाझडती घेतली.जम्बो हॉस्पिटलबाबत नागरिकांची विश्वासार्हता वाढविण्यासाठी येथील परिस्थिती व व्यवस्थापन सुरळीत असणे आवश्यक आहे. जम्बो हॉस्पिटलबाबतच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे ठणकावून सांगत येथील बेडच्या उपलब्धतेची माहिती पोहोचविण्यात तसेच उपचारात हलगर्जीपणा झाल्यास दोषींवर कारवाई करण्यात येईल असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातून पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी कोरोना बाधित रुग्ण दाखल होत आहेत. कोरोनाच्या रुग्णांना वेळेत व योग्य ते वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी शासकीय यंत्रणेने पूर्ण क्षमतेने काम करावे. कोरोना परिस्थती नियंत्रणासाठी राज्य शासन सर्व प्रकारे मदत करत असून दोन्ही महापालिकेच्या आरोग्य विभागाने देखील सक्रियपणे काम करावे. पुण्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर या जिल्ह्यांमध्ये देखील ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी विभागीय आयुक्तांनी नियोजनबध्द कार्यवाही करावी. विभागातील पाचही जिल्ह्यात कोरोनाविषयक काम करताना एकाच अधिकाऱ्यावर कामाचा ताण येऊ नये तसेच कामात गतीमानता येण्याच्यादृष्टिने विषयनिहाय जबाबदाऱ्या सोपवून कामाचे विकेंद्रीकरण करावे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
विभागातील कोणत्याही रुग्णाला ऑक्सिजन अभावी जीव गमवावा लागू नये, यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. ऑक्सिजन टँकरचा वाहतुकी दरम्यानचा वेळ वाचवण्यासाठी तसेच रुग्णालयात जलदगतीने ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी ऑक्सिजन टँकरला ॲम्ब्युलन्स प्रमाणे सायरनची व्यवस्था करुन घ्यावी. तसेच पोलीस विभागाने ऑक्सिजन टँकर मार्गस्थ होण्यासाठी प्रयत्न करावेत, जेणेकरुन हे टँकर वाहतूक कोंडीतून जलदगतीने बाहेर पडतील असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
रुग्णालयांमध्ये उपलब्ध असणाऱ्या बेडची माहिती लोकप्रतिनिधींसह रुग्ण व सर्वसामान्यांना मिळण्यासाठी संगणकीय प्रणालीमध्ये अद्ययावत नोंदी करण्याबरोबरच बेड उपलब्ध करुन देण्याचे नियोजन दोन्ही महानगर पालिकांनी करावे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे असे सांगून अजित पवार यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १५ सप्टेंबर पासून राज्यभर ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ ही जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेला सर्व लोकप्रतिनिधी, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, गावांमधील दक्षता समित्या व स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य करावे. हे अभियान सर्वांनी मिळून प्रभावीपणे राबवूया असे आवाहनही अजित पवार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *