मोदींना RSS चा जुना मित्र ‘मुस्लिम लीग’ची आठवण.
मुंबई, दि. ८ एप्रिल:
लोकसभा निवडणुकीचा प्रचार आत्ताच सुरु झाला असला तरी ४०० पार चा नारा दिलेल्या मोदीशहांना पराभव दिसू लागला आहे. पराभवाच्या मानसिकतेतून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बेछूट आरोप करत आहे. काँग्रेसच्या जाहिरनाम्याचा संबंध मुस्लीम लिगशी लावणे हे त्याचेच लक्षण आहे. निवडणुकीत भाजपची परिस्थिती खालावत चालली असल्यानेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जुना मित्र ‘मुस्लिम लीग’ची आठवण येऊ लागली आहे, असा हल्लाबोल मुंबई काँग्रेसच्या विभागीय अध्यक्ष प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी केला आहे.
काँग्रेस पक्षावरील आरोपाला उत्तर देताना प्रा. वर्षाताई गायकवाड म्हणाल्या की, मोदी-शहांच्या राजकीय आणि वैचारिक पूर्वजांनी स्वातंत्र्याच्या लढाईत भारतीयांच्या विरोधात जाऊन ब्रिटिश आणि मुस्लिम लीग ला साथ दिली होती. १९४२ मध्ये जेव्हा महात्मा गांधी यांनी इंग्रजांविरुद्ध ‘भारत छोडो’ ची हाक दिली तेव्हा त्याच्या समर्थनात भारतरत्न मौलाना आझाद यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाने देशभर आंदोलन केले आणि संपूर्ण देश रस्त्यावर उतरला होता आणि त्यावेळी मोदी-शहांच्या पूर्वजांनी देशाच्या या आंदोलनाला विरोध केला होता. मोदी-शहांच्या पूर्वजांनी १९४० च्या दशकात बंगाल, सिंध और नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉविंसमध्ये मुस्लिम लीगसोबत सरकार स्थापन केले आणि १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलन कसे चिरडावे याबद्दल इंग्रज सरकारला सूचनाही केल्या होत्या. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नरला पत्र लिहून १९४२ चे भारत छोडो आंदोलन कसे दडपले जावे हे लिहिले नव्हते का? आणि त्यासाठी ते इंग्रजांना साथ द्यायला तयार आहेत असे म्हटले नव्हते का? याचे उत्तर मोदी परिवाराने देशाला द्यावे.
सर्वसामान्य जनतेच्या योगदानाने बनवलेल्या काँग्रेस न्याय पत्र च्या (काँग्रेसचा जाहिरनामा) विरोधात अपप्रचार करीत आहेत, लोकांना भरकटवण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी भाजपा जाती धर्मात भांडणे लावत असते तोच हा प्रकार असून मुस्लीम लिग बद्दल नरेंद्र मोदी आणि त्यांच्या चरणी लीन असलेल्यांना एवढा पुळका का? असा प्रश्न वर्षाताई गायकवाड यांनी विचारला आहे. काँग्रेस न्याय पत्रावर भारतातील १४० कोटी लोकांच्या आशा आणि आकांक्षांची छाप असल्याने मोदी व भाजपा पुरते हादरले आहेत. लोकसभा निवडणुकीत मोदींच्या अन्यायकारी, लोकशाहीविरोधी सत्तेचा पराभव निश्चित आहे, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. या निवडणुकीत जनतेची एकत्रित ताकद ह्या हुकूमशाही राजवटीचा अंत करेल, हे अटळ आहे, असे वर्षाताई गायकवाड म्हणाल्या.
