वंचितने मतविभाजनाचे पाप करु नये.
भंडारा, दि. ५ एप्रिल;
भाजपाने केवळ हिंदू-मुस्लीम समाजात भांडणे लावून शांतता बिघडवण्याचे काम केले तर राहुल गांधी यांनी समाजात एकोपा रहावा यासाठी भारत जोडो यात्रा काढली. सर्वधर्म समभावाची प्रेरणा घेऊन देश पुढे जात असताना भाजपाने त्याला छेद दिला. देश सध्या कठीण प्रसंगातून जात आहे, देशाला कमजोर केले जात आहे. मोदी सरकार पुन्हा आले तर निवडणुकाही होणार नाहीत, हा धोका टाळण्यासाठी नरेंद्र मोदी सरकार हटवून इंडिया आघाडीचे सरकार आणा, असे आवाहन प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले.
भंडारा गोंदिया लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या भंडारा येथील प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते, ते पुढे म्हणाले की, देशाला प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते पण त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. शेतकरी दररोज आत्महत्या करत आहे, केंद्र सरकार नोकर भरती करत नाही, कंत्राटी पद्धतीने पदे भरत आहेत तर दुसरीकडे लाखो तरुण नोकरीपासून वंचित आहेत. महागाई कमी केली नाही, १५ लाख रुपये खात्यात जमा करणार अशा गॅरंटी दिल्या पण या सर्व मोदी गॅरंटी खोट्या निघाल्या.
यावेळी बोलताना खासदार मुकुल वासनिक म्हणाले की, भाजपा हा काँग्रेस पक्षाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. इन्कम टॅक्सच्या नोटीस पाठवल्या जात आहेत, त्याच नियमाप्रमाणे भाजपाला नोटीस पाठवली तर ५ हजार कोटी रुपये वसुल करावे लागतील. काँग्रेस पक्ष हा महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन वाटचाल करत आहे, ते भाजपाला चालत नाही, राज्यघटना बदलण्याचा त्यांचा डाव आहे. नरेंद्र मोदींनी जनतेला खूप आश्वासने दिली पण शेवटी काय झाले, ज्याला नेता समजले तो अभिनेता निघाला. भारतीय राजकारणावर मोठं संकट आले आहे, भाजपाचे पुन्हा सरकार आले तर लोकशाहीचा अस्त होईल व तानाशाही सुरु होईल, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना संपुष्टात येईल.
यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भाजपा सत्तेत आले तर २४ तासात ओबीसी आरक्षण देतो अशी वल्गणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती पण आरक्षण काही दिले नाही. भटक्या जाती, आदिवासी यांना संपवण्याचे काम भाजपा करत आहे. राहुल गांधी यांनी न्याय यात्रेत जनतेशी संवाद साधला, यातूनच ५ न्याय २५ गॅरंटी बनवल्या आहेत. काँग्रेस पक्षाने आपल्या जाहिरनाम्यात महिला, तरुण, शेतकरी, कामगार, व हिस्सेदारी असे ५ न्याय दिले आहेत. काँग्रेसचे ५ न्याय व २५ गॅरंटी हे घरोघरी पोहचवण्याचे काम करा. काँग्रेसच्या गॅरंटीची चायना माल अशी टिंगल भाजपा करत आहेत. कोरोनाचे संकट पाहून तातडीने उपाय करण्याचा सल्ला राहुल गांधी यांनी दिला होता त्याचीही भाजपाने अशीच टिंगळटवाळी केली होती, आताही तेच सुरु आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ओवेसीच्या एमआयएम व वंचितने मतविभाजन केल्याने भाजपाच्या विजयाचा मार्ग सोपा केला. आजची लढाई सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची वेळ आहे, मतविभाजनाचे पाप करु नका, असे आवाहन पटोले यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांना केले.
महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खा. मुकुल वासनिक, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी खा. मधुकर कुकडे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, माजी खा.खुशाल बोपचे, भंडारा शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत देशकर, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई आदी उपस्थित होते.
