शासकीय आश्रम शाळेत दूध घोटाळा..
पुणे, दि. २४ मार्च:
राज्यातील शासकीय आश्रम शाळेमध्ये दूध पुरवठा करण्यामध्ये मोठा घोटाळा झाला आहे. २०२३-२४ मध्ये १६४ कोटी रुपयांचे दूध पुरवठा कंत्राट देण्यात आलं. शेतकऱ्यांकडून सरासरी ३० रुपये लिटरने दूध घेतलं जातं मात्र या कंपन्यांनी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दिलेले दूध हे तब्बल १६४ रुपये लिटर दराने दिलं आहे. या गरीब मुलांना दूध देताना सरकारकडून करारामध्ये ८५ कोटी पर्यंत खर्च येणे अपेक्षित होते तो १६५ कोटींवर गेला आणि सरकारने तब्बल ८० कोटींची दलाली दिली असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
आमदार रोहित पवार यांनी राज्यातील शासकीय आश्रम शाळेत दूध घोटाळ्याचा पुण्यातील पत्रकार परिषदेत पर्दाफाश केले. रोहित पवार म्हणाले की, राज्यात एकूण ५५२ शासकीय आश्रमशाळा आहेत. ज्यामध्ये सर्वसामान्य आदिवासी कुटुंबातील लहान मुले शिकतात. त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी सरकारकडून पौष्टिक आहार दिला जातो. ज्यामध्ये २०० एमएल दूध दररोज या विद्यार्थ्यांना दिले जाईल असा जीआर काढण्यात आला, त्यासाठी कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले. २०१८-१९ आणि २०२३-२४ या वर्षांमध्ये करण्यात आलं आहे. हे दूध अमूल, चितळे, महानंदा यासारख्या कंपन्यांकडून घेऊन टेट्रा पॅकच्या माध्यमातून लहान मुलांना दिलं जातं. या दुधाची एका लिटरची किंमत ही ७०-७५ रुपये लिटर आहे. यामध्ये २०१८-१९ मध्ये हा करार झाला होता त्यावेळी ४६.४९ लिटर असे अमूल, महानंद, आरे, चितळे त्यांच्याकडून दूध घेण्यात आलं होतं तर त्यानंतर दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये अमूल सोबत ५०.५ रुपये एका टेट्रा पॅक मागे देण्यात आले.
सरकारने महानंद कंपनीला फायद्यामध्ये आणण्यासाठी गुजरातला दिल्याचे सांगितलं मात्र या सर्व दुधाचं कंत्राट महानंदला देण्यात आलं असत तर ८४ कोटींचा प्रॉफिट केवळ महानंदला झाला असता मात्र यामध्ये पूर्ण कॉन्ट्रॅक्ट एका प्रायव्हेट कंपनीला तसेच सत्तेत असणाऱ्या कोल्हापूरच्या नेत्याच्या सहकारी संस्थेला देण्यात आलं. जे दूध शेतकऱ्यांकडून ३० रुपये लिटरने घेण्यात आलं तेच दूध या गरीब विद्यार्थ्यांना तब्बल १८३ रुपये लिटर याप्रमाणे दिले गेले. हा करार जर मार्चमध्ये झाला तर काही लोक विकासासाठी भाजपसोबत जाण्याचे तीन महिने आधीच ठरले होते का? असे रोहित पवार म्हणाले.
