‘तुतारी’ जोरदार वाजेल ही माझी गॅरंटी.

0
images (68)

इंदापूर, दि. २३ मार्च ;

यंदाच्या निवडणुकीत इंदापूरात जोरदार तुतारी वाजणार असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी व्यक्त केला आहे. माझ्यावर टीका करणाऱ्यांना मला सांगायचे आहे. सहा महिन्यांपूर्वीच आपला घटस्फोट झाला आहे. त्यामुळे माझ्यावर टीका करताना विचार करून टीका करा. कारण आपण एकाच ताटात जेवत होतो. त्यामुळे माझ्यावर आरोप करणाऱ्यांना चेतावणी देते. माझ्यावर आरोप करायचा असेल तर मी इंदापूरच्या चौकात येते. तुम्ही पण या म्हणाल त्या विषयावर चर्चा करू असे सुप्रिया सुळे यांनी ठणकावले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यात सध्या दमदाटी केली जात आहे. पवारांच्या सभेला जाऊ नका, असे सांगितले जात आहे. पण मला सांगायचं आहे की, हा इंदापूर तालुका आहे. इथे शरद पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे. इथले लोक फोनला, धमक्यांना घाबरणार नाहीत. विरोधकांनी त्यांचाच विचार करावा. कारण यंदा विधानसभेत करेक्ट कार्यक्रम होणार आहे.

रोहित पवार, युगेंद्र पवार हे माझा प्रचार करत आहेत. ते आजोबा शरद पवार यांच्यासोबत उभे राहिले आहेत. युगेंद्र पवार यांचा दोन वेळा रस्ता अडवण्यात आला. ते लोकशाही पद्धतीने शांततेने प्रचार करत आहेत. मी युगेंद्र पवार यांच्या सुरक्षेची मागणी केली. त्यानंतर माझ्यावरही टीका झाली. कुठल्याही मुलावर हल्ला झाल्यावर त्या आईचा कोणी विचार करणार की नाही? टीका करताना पातळी सोडली जात आहे. हे काय संस्कार आहेत का?, असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला.

इंदापूरमध्ये शरद पवार यांचे अनेक कार्यकर्ते आहेत. हा तालुका शरद पवार यांच्याववर खूप प्रेम करतो. या इंदापुरात काही राजकीय बदल झाले. या निवडणुकीत काय झालं काही समजेनासे झाले आहे. मी तीन निवडणुका लढवल्या. मागच्या निवडणुकीत माझ्याविरोधात राहुल कुल यांचे संपूर्ण कुटुंब होते. मी राहुल कुल आणि त्यांच्या पत्नीचे कौतुक करते की त्यांनी कधीही पातळी सोडून टीका केली नाही. तिन्ही निवडणुका सुसंस्कृत होत्या. पण या निवडणुकीत काय गडबड झाली ते कळत नाही अशी खंत देखील सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *