उद्धव ठाकरेंच्या भाषणात फक्त मत्सर..

0
images - 2023-11-10T193746.316

मुंबई, दि. २१ मार्च –

उद्धव ठाकरेंच्या पोटातील मळमळ बाहेर येतेय आणि त्याच्या उलट्या त्यांना ठिकठिकाणी सभेतून होताना दिसताहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा द्वेष त्यांच्या नसानसांत भरलेला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा द्वेष, मत्सर हा ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख अजेंडा झालेला आहे, अशी टीका भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केली आहे.

पत्रकारांशी बोलताना दरेकर यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, आमच्या तिन्ही पक्षांत समन्वय आहे. त्याचपद्धतीने मनसे आली तरी समन्वयाची भुमिका घेऊन तोडगा काढण्याची क्षमता भाजपात आहे. जागा आणि उमेदवारांपेक्षा या देशाचे पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदी व्हावेत ते देशासाठी आणि पक्षासाठी महत्वाचे आहे. त्यामुळे आमच्यात कुठल्याही प्रकारचा तिढा असणार नाही. जे होईल ते समन्वयातून, सामोपचारातून होईल.

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानांचा समाचार घेताना दरेकर म्हणाले की, बाळासाहेबांनी निर्माण केलेली शिवसेना विचारांसहित पूर्णपणे एकनाथ शिंदे भाजपसोबत घेऊन आले. त्यातून उद्धव ठाकरेंना पोटशूळ होतोय. उद्धव ठाकरे यांचा खताशी कधी संबंध आला आहे का? त्यांचा फक्त खाण्याशी संबंध आहे. त्यांनी पोती उघडून खत कधी पाहिले आहे का? नाहीतर अशा प्रकारचे वक्तव्यच त्यांनी केले नसते. शेणखत हे उत्तम खत आहे हे उद्धव ठाकरेंना कळत नाही का? शेतीतील माहिती नाही आणि शेतकऱ्यांचा पुळका दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. पंतप्रधान मोदी काय करताहेत हे संपूर्ण देश पाहतोय. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम मोदी करताहेत. नुसते पब्लिसिटीसाठी शिव्यांच्या लाखोल्या वाहायच्या या पलीकडे उद्धव ठाकरे काही करू शकत नाही. त्याचबरोबर आमशा पाडवी, रविंद्र वायकर सोडून गेले. तरी तुम्हाला अक्कल येणार नसेल तर काय बोलायचे. मर्दानगीच्या भाषा करायच्या, पळणारे नाही लढणारे आहोत बोलायचे. ईडीच्या नोटीसला घाबरत नाही बोलता मग तुमच्या माणसांना नोटीसा आल्या त्यांना संरक्षित करायची धमक तरी तुमच्यात आहे का? असा प्रश्नही दरेकरांनी विचारला.

मनसे महायुतीत सहभागी होण्याच्या प्रश्नावर बोलताना दरेकर म्हणाले की, राज ठाकरे महायुतीत आले तर निश्चितच फायदा होईल. राज ठाकरे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय नेते, चांगले वक्ते आहेत. उद्धव ठाकरेंना याचीच तिडीक आलीय. कारण आतापर्यंत बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार एकनाथ शिंदे घेऊन गेले. संपूर्ण शिवसेना शिंदेंसोबत गेली. उद्धव ठाकरे ठाकरे नावावर जी राजकीय मिजास करत होते ती राजकीय मिजास राज ठाकरे भाजपासोबत आल्यामुळे संपणार आहे. ज्या ठाकरे नावावर त्यांची कोल्हेकुई महाराष्ट्रभर चालू आहे ती राज ठाकरे यांच्यामुळे संपुष्टात येणार असल्याने ते विचलित झाले असल्याचा टोलाही दरेकरांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *