इंडिया आघाडीचा मेळावा म्हणजे ‘फ्लॉप शो’
मुंबई, दि १९ मार्च:
इंडिया आघाडीने सभा छत्रपती शिवाजी महाराज पार्क ऐवजी षण्मुखानंद सभागृहात घेतला असता तरी चालले असते. एवढा खर्च करण्याची आवश्यकता नव्हती. २५ पक्षांनी एकत्र सभा घेऊन सुद्धा मैदान भरू शकत नाही, हा प्रकार नैराश्यपूर्ण व वेळकाढूपणा करणारा असून इंडिया आघाडीचा मेळावा म्हणजे फ्लॉप शो असल्याची टीका शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली.
इंडिया आघाडीच्या मेळाव्यावरून उदय सामंत यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे आणि त्यांच्या मित्र पक्षांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, बाळासाहेब जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर शिवसेनेची सभा घ्यायचे त्यावेळेस त्यांचे विचार ऐकण्यासाठी संपूर्ण मैदान आणि आजूबाजूचा परिसर गर्दीने ओसंडून जायचा. या मेळाव्याला एवढी कमी गर्दी होती की, येथे आलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हे काय सुरु आहे, अशा प्रकारचे प्रश्नचिन्ह होते. यापेक्षा जास्त गर्दी शिवसेनेच्या किंवा महायुतीच्या तालुक्याच्या सभेमध्ये असते.
या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब यांचे फक्त एकदा नाव उच्चारले. इतर पक्षाच्या नेत्यांनी बाळासाहेबांच्या नावाचा उच्चारदेखील केला नाही. अगदी राहुल गांधी यांनी देखील बाळासाहेबांचे नाव आपल्या भाषणात घेतले नाही. इंडिया आघाडीच्या नेत्यांचे भाषण सुरु असताना हे भाषण कशासाठी सुरु आहे, त्याचा अर्थ सुद्धा कित्येक कार्यकर्त्यांना उमगत नव्हता. कार्यकर्त्यांचे सोडून द्या भाषण करणाऱ्या व्यक्तीला तरी त्या भाषणाचा अर्थ समजला का, हा देखील संशोधनाचा विषय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणे, एवढेच या मेळाव्यात सुरु होते. महाराष्ट्रात निवडणुकीच्या सुरुवातीला आचारसंहिता लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्रातील जनतेने इंडिया आघाडी व महाविकास आघाडीला नाकारले. त्यामुळे महायुती सरकारला कुणीही तडीपार करू शकत नाही, हे सिद्ध झाले आहे आणि महायुतीचे ४५ पेक्षा जास्त खासदार महाराष्ट्रात निवडून येतील याची खात्री आहे.
शिवसेना अखंड असताना शिवाजी पार्कमध्ये बाळासाहेबांचे भाषण शेवटचे असायचे, त्यांच्या पश्च्यात उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाले त्यावेळेस ते ४५ मिनिटे भाषण करायचे पण इंडिया आघाडीच्या मेळाव्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सूचना केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना फक्त पाच मिनिटे भाषण करण्याची संधी मिळाली, हे अतिशय दुःखदायक आहे. भविष्यात उबाठा काँग्रेसमय होऊन नाना पटोले यांच्या निर्देशानुसार काम करेल अशी शक्यता निर्माण झाली आहे, असे मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
