एक गॅरंटी तर पक्की ‘मोदी तो गयो’ !
चांदवड, दि. १४ मार्च :
भारत जोडो न्याय यात्रेतून राहुल गांधी शेतकऱ्याची, जनतेची बात ऐकत आहेत पण काही लोक फक्त मन की बातच करतात. या यात्रेमुळे देश जोडण्याचे, लोकांना जोडण्याचे काम केले आहे. चांदवड ही कांदा नगरी आहे पण या कांद्याने शेतकऱ्याला रडवले आहे. भाजपाच्या राज्यात गद्दार आमदार खासदारांना ५०-५० कोटी रुपयांचा भाव मिळतो पण कांद्याला भाव मिळत नाही, असा सणसणीत टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला.
चांदवडच्या शेतकरी मेळाव्यात बोलताना संजय राऊत यांनी तुफान फटकेबाजी केली, देशाच्या पंतप्रधानांनी जय जवान व जय किसानचा नारा दिला होता पण आज भाजपा राज्यात शेतकरी व जवान दोघेही मरत आहेत. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी राहुल गांधी यात्रा काढत आहेत. या यात्रेने एक गॅरंटी तर पक्की केली आहे आणि ती म्हणजे ‘मोदी तो गयो’ असे म्हणत मोदी सरकार पुन्हा येणार नाही, असे स्पष्ट केले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, २०१४ च्या निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांनी सरकार आले की पहिली सही शेतकरी कर्जमाफीच्या फाईलवर करेन असे आश्वासन दिले होते, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, हमी भाव देणार अशी आश्वासने यवतमाळमध्ये दिली होती पण १० वर्षात ती पूर्ण केली नाहीत, मोदींनी शेतकऱ्यांना फसवले आहे. कांदा नाही खाल्ला तर काही फरक पडत नाही असे भाजपच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण म्हणाल्या होत्या. या शेतकरीविरोधी व शेतकऱ्यांना फसवणाऱ्या भाजपा सरकारचा करेक्ट कार्यक्रम करायची वेळ आली आहे आणि लोकसभा निवडणुकीत तो करा, असे आवाहन पटोले यांनी केले.
विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, मणिपूरपासून राहुल गांधी हे शेतकरी, तरुण, कामगार, महिला वर्गाला गॅरंटी देत आहेत. २००४ ते २०१४ या काळात युपीए सरकार जनतेचे, शेतकरी हिताचे निर्णय घेत होते परंतु मागील १० वर्षात केवळ मुठभर लोकांसाठी निर्णय घेतले जात आहेत. आज शेतकरी संकटात आहे त्याला भारतीय जनता पक्षाचे सरकारच जबाबदार असेही थोरात म्हणाले.
